तिरोडीतील अदानी विद्युत प्रकल्पासाठी आणि प्रकल्पाच्या पाईपलाईनसाठी शेतजमीन देणाऱ्या परिसरातील गावांमधील शेतकरी व तेथील सरपंचांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. आपल्या मागण्या पूर्ण करा, नाहीतर ८ एप्रिलपासून उपोषणाला बसण्याचा इशाराही त्यांनी दिला.
अदानी विद्युत प्रकल्पाकडून मौजा मेंदीपूर, काचेवानी, गुमाधावडा, खैरबोडी, गराडा, चिरेखनी, कवलेवाडा येथील शेतकऱ्यांची एकूण ५५० हेक्टर आर. शेतजमीन प्रकल्पासाठी घेण्यात आली, तसेच खैरबोडी, चिरेखनी, कवलेवाडा व गुमाधावडा या चार गावांच्या हद्दीतून अदानीची पाईप व टॉवरलाईन गेल्याने शेतकऱ्यांची जमीन बाधित झाली आहे. त्या मोबदल्यात संबंधित शेतकऱ्यांना नोकरी देण्याचे आश्वासन कंपनीकडून देण्यात आले होते, मात्र त्याची पूर्तता करण्यात आली नाही. यातूनच १५ दिवसांपूर्वी मनमोहन दुलीचंद कटरे या शेतकऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकरणी १६ मार्च रोजी तिरोडय़ाच्या तहसीलदारांनी प्रकल्पातील अधिकारी व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची बठक घेतली. या बठकीत अदानी प्रकल्पाकडून ५ एप्रिल रोजी आयोजित सभेत सर्व अटींची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले. या सभेत मागण्यांची पूर्तता न झाल्यास ८ एप्रिलपासून या सहा गावांतील गावकरी प्रकल्पासमोर बेमुदत उपोषण करणार असल्याचे निवेदन आज  सहाही गावच्या सरपंच व शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
निवेदनात या ६ गावांच्या नागरिकांच्या सुविधेसाठी २ कोटी प्रती गाव एक वेळचे अर्थसहाय देण्यात यावे, बाधित गावातील प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी व प्रकल्पग्रस्ताने नोकरी नाकारल्यास प्रत्येकी ५ लाख रुपये रोख देण्यात यावे, प्रकल्पग्रस्त पुनर्वसन अधिनियमानुसार जे लाभ व सोयी सुविधा जास्त असतील त्या देण्यात याव्या, करारनाम्याची पुढील कारवाई चार दिवसात करण्यात यावी, औद्योगिक कायद्यानुसार परिसरातील जनतेसाठी करण्यात आलेले नियम लागू करावे, अदानी प्रकल्प व शेतकऱ्यांमधील करारानुसार अदानी प्रकल्पातील अन्य कोणत्याही कंपनीत नोकरी न देता अदानीतच नोकरी देण्यात यावी, कोणत्याही प्रकारची भरती करताना तिरोडा तालुक्यातील ८० टक्के लोकांना कायम स्वरूपाच्या नोकरीस प्राधान्य देण्याचा लेखी करार करावा, राज्य सरकार व अदानी प्रकल्प यांच्या ५ वर्षांत झालेल्या चर्चा व बठकीचे अहवाल बाधित गावातील ग्राम पंचायतींना देण्यात यावे, तर शेतकरी मनमोहन कटरे यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या अदानीच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशा मागण्यांचा समावेश आहे. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात खैरबोडीच्या सरपंच शकुंतला परतेती, कवलेवाडाच्या देवकनबाई पारधी, मेंदीपूरच्या मुक्ता रहांगडाले, चिरेखाणीचे जगन्नाथ पारधी, गुमाधावडाच्या साधना बंसोड, काचेवानीच्या चौधरी, खैरबोडी ग्रामपंचायत सदस्य वाय.टी.कटरे, संतोष पारधी, गौतमा मेश्राम, सुचिता खंडाते, चंद्रशेखर गजभिये, छाया बिसेन व इतर शेतकरी सहभागी झाले होते.