जनजागृती उदंड, पण दृष्टिपथास येईना उद्दिष्ट

सचिन व सुप्रिया पिळगावकरांचा सहभाग असलेल्या ‘मधुरा’ माहितीपटाचे सादरीकरण, ‘गोष्ट माझ्या ताईची’ पुस्तिकांचे वितरण, प्रियदर्शनी बाहुलीद्वारे प्रदर्शने, लोककलांद्वारे जनजागृती, संवेदनशील भागातील वीज देयकांवर ‘मुलगी वाचवा’चा संदेश, असाच संदेश देणारे जाहिरात फलक..

सचिन व सुप्रिया पिळगावकरांचा सहभाग असलेल्या ‘मधुरा’ माहितीपटाचे सादरीकरण, ‘गोष्ट माझ्या ताईची’ पुस्तिकांचे वितरण, प्रियदर्शनी बाहुलीद्वारे प्रदर्शने, लोककलांद्वारे जनजागृती, संवेदनशील भागातील वीज देयकांवर ‘मुलगी वाचवा’चा संदेश, असाच संदेश देणारे जाहिरात फलक.. आदी माध्यमातून स्त्री भ्रुणहत्या रोखण्यासाठी प्रयत्न होत असले तरी त्याची फलनिष्पत्ती दृष्टीपथास येत नसल्याचे चित्र आहे. आतापर्यंत दाखल झालेल्या प्रकरणांची संख्या लक्षात घेतल्यास प्रसवपूर्व गर्भलिंगनिदानबाबत व्यापक जनजागृती करूनही काही विशिष्ट घटकांमुळे त्यात अवरोध येत असल्याचे दिसत आहे.
राज्य पर्यवेक्षकीय मंडळाच्या बैठकीत प्रसिद्धी व जनजागृतीच्या कार्यक्रमाचाही आढावा घेण्यात आला. त्यात वर्षभरात राबविलेल्या उपक्रमांवर नजर टाकल्यास ही बाब दिसून येते. गर्भलिंग निदान कायद्यातील तरतुदी व मुलीच्या जन्माचे महत्व सांगणाऱ्या ‘मधुरा’ माहितीपटाचे ग्रामसभेत सादरीकरण करण्याचे नियोजन होते. या सीडी सर्व विधानसभा व विधान परिषद सदस्या तसेच जिल्हा परिषदांनाही वितरित करण्यात आल्या होत्या. तसेच ग्रामीण रुग्णालय व आरोग्य संस्थांनाही त्याचे वितरण करण्यात आले. त्यातील किती ग्रामसभा, किती लोकप्रतिनिधी वा किती शासकीय रुग्णालयांनी पुढाकार घेऊन हा माहितीपट सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविला, हा प्रश्न अनुत्तरीत आहे. मुलीच्या जन्माचे स्वागत याबद्दल सह्याद्री व खासगी वाहिन्यांवरून जनजागृती करण्यात आली. इतकेच नव्हे तर, आकाशवाणीवरूनही रेडिओ जिंगल्स प्रसारित करण्यात आल्या. जनजागृतीसाठी वृत्तपत्र माध्यमाचाही आधार घेतला गेला.
मुलीच्या जन्माचे महत्व सांगणाऱ्या गोष्ट माझ्या ताईची या पुस्तिका सर्वत्र वाटप करण्यात आल्या. मुलीचे महत्व व विवाहाचे वय याबद्दल घडीपत्रिका, फॅल्श कार्ड, फ्लिप बुक मुद्रीत करण्यात आले. मुलगी वाचवा हा संदेश देणारी प्रियदर्शनी बाहुलीद्वारे यात्रांच्या ठिकाणी प्रदर्शने आयोजित करून प्रसिद्धी करण्यात आली. गणेशोत्सव मंडळांना आरोग्य शिक्षण साहित्य, पोस्टर्स, फोल्डर्स तसेच मधुरा माहितीपटाच्या सीडी वितरित करण्यात आल्या. स्त्री भ्रुणहत्या प्रमाणकानुसार जे भाग संवेदनशील आहेत, त्या ठिकाणी वीज देयकांवर मार्च २०१३ मध्ये मुलगी वाचवाचा सचित्र संदेश प्रसिद्ध करण्यात आला. स्त्री भ्रुण हत्येचे प्रमाण जास्त असणाऱ्या ग्रामीण भागात जनजागृतीपर फलक उभारण्यात आले. मोबाईल व्हॅनद्वारे जनजागृती करण्यात आली. या मोहिमेंत नाटय़ प्रयोगांचाही वापर करण्यात आला. आठ टिकल्यांची बाई, रानजाई गं, सुंदर माझे घर, या चिमण्यांनो परत फिरा या नाटय़प्रयोगांचे सादरीकरण करण्यात आले.
जिल्हा स्तरावर लोककला कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. जागतिक महिला दिन व इतर आरोग्य दिनानिमित्त फेरी, पथनाटय़े याद्वारे जनजागृतीचा प्रयत्न करण्यात आला. आदिवासी भागात स्थानिक भाषेमधून गर्भलिंग निदान व इतर आरोग्य शिक्षण साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. ग्रामीण रुग्णालयांतर्फे आरोग्य मेळा आयोजन करून गर्भलिंगनिदानविषयी जनजागृती करण्यात आली. वर्षभरातील या कार्यक्रमांची लक्षणिय संख्या पाहिल्यास शासनाने जनजागृतीसाठी कोणतीही कसर शिल्लक ठेवली नसल्याचे लक्षात येते. परंतु, शासनाने योजलेल्या उपायांची प्रशासकीय पातळीवरून कशी अंमलबजावणी झाली हा देखील वादाचा मुद्दा ठरू शकतो. लालफितीत काम करणाऱ्या आरोग्य विभागाची मानसिकता फारशी वेगळी नाही. स्त्री भ्रुणहत्या रोखण्यासाठी कोटय़वधीचा खर्च केला जात असला तरी हे प्रकार पूर्णपणे नियंत्रणात येऊ शकलेले नाही. या कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी दाखल असणारी ४३२ प्रकरणे हे त्याचेच निदर्शक म्हणता येईल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Save girl child campaign review in supervisory board meeting