माध्यमिक शाळेत शिक्षण घेणाऱ्या इयत्ता पाचवी ते दहावीच्या वर्गामधील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सरकारकडून गुणवत्ता शिष्यवृत्ती दिली जाते. या वर्षीपासून शिष्यवृत्ती ऑनलाईन केल्याने विद्यार्थ्यांना राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडावे लागत आहे. वर्षांकाठी मिळणाऱ्या ५०० ते १ हजार रुपये शिष्यवृत्तीचा सर्वाधिक फायदा बँकांनाच मिळणार आहे. खाते शून्य रुपयांनी उघडले, तरी खात्यावर मात्र किमान ५०० रुपये अनामत ठेवण्याच्या बँकेच्या धोरणामुळे शिष्यवृत्तीचा फायदा बँकांनाच मिळणार असल्याचे चित्र आहे.
बँकेत खाते उघडण्यास विद्यार्थ्यांसह पालकांना होणारा त्रास व खर्च यामुळे ‘भीक नको पण..’ अशी म्हणण्याची वेळ शिष्यवृत्तीधारकांवर आली आहे. राज्य सरकारच्या समाजकल्याण विभागामार्फत माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या पाचवी ते दहावी या वर्गातील मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता शिष्यवृत्ती दिली जाते. ५० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांमधून पहिले दोन व गुणवत्ताप्रधान विद्यार्थ्यांना पाचवी ते सातवीपर्यंत दरमहा ५० रुपये, असे वर्षांकाठी ५०० रुपये, तर आठवी त दहावीच्या विद्यार्थ्यांना दरमहा १०० रुपये या प्रमाणे वर्षांकाठी १० महिन्यांचे १ हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते.
पहिली त दहावीपर्यंतच्या अनुसूचित जाती, विमुक्त, भटक्या जमाती, विशेष मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणासह परीक्षा शुल्कासाठी दरमहा रक्कम दिली जाते. पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना १०० रुपये, पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना १५० रुपये, तर आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना २०० रुपये उपस्थिती भत्ता दिला जातो. मागील वर्षांपर्यंत खासगी व कायम विनाअनुदानित शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना उपस्थिती भत्ता आणि शिष्यवृत्ती थेट शाळेमार्फत दिली जात होती. मात्र, यात गरव्यवहार होऊ लागल्याने समाजकल्याण विभागाने चालू वर्षांपासून शिष्यवृत्ती ऑनलाईन देण्याचे धोरण सुरू केलेआहे.