अमरावतीत विद्यार्थ्यांच्या वाहतुकीचा प्रश्न अधांतरीच

गेल्या आठवडय़ात नवसारी येथे झालेल्या स्कूलव्हॅन अपघाताच्या चौकशीचा अहवाल शासनाकडे पाठवण्यात आला असला तरी या अहवालावर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. दुसरीकडे प्रादेशिक परिवहन विभाग आणि पोलीस प्रशासनाने शाळकरी मुलांच्या वाहतुकीसाठी नियमावलीचा हट्ट धरल्याने स्कूलव्हॅन सेवा

पोलीस, आरटीओंचा नियमावलीचा अट्टहास, पालक मात्र हतबल

गेल्या आठवडय़ात नवसारी येथे झालेल्या स्कूलव्हॅन अपघाताच्या चौकशीचा अहवाल शासनाकडे पाठवण्यात आला असला तरी या अहवालावर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. दुसरीकडे प्रादेशिक परिवहन विभाग आणि पोलीस प्रशासनाने शाळकरी मुलांच्या वाहतुकीसाठी नियमावलीचा हट्ट धरल्याने स्कूलव्हॅन सेवा अजूनही सुरळीत होऊ शकलेली नाही. पालकांचे मात्र त्यामुळे प्रचंड हाल सुरूच आहेत.
गेल्या २७ नोव्हेंबरला स्कूलव्हॅन आणि एस.टी. मिनीबस यांच्यात टक्कर झाल्याने सहा विद्यार्थ्यांना प्राण गमवावे लागले. या अपघाताचे पडसाद शहरात सर्वच स्तरावर उमटले आणि त्यामुळे वाहतूक पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागाला कडक भूमिका घ्यावी लागली. त्याचा फटका मात्र सर्वसामान्य पालकांना बसला आहे. गेल्या नऊ दिवसांपासून शहरात ठप्प झालेली स्कूलव्हॅन सेवा अजूनही पूर्वपदावर आलेली नाही. अमरावती शहरात शाळकरी मुलांची वाहतूक करण्यासाठी शहरात अडीचशे स्कूलव्हॅन आहेत. यात सुधारणा करणाऱ्यांना आरटीओतर्फे परवाने दिले जात आहेत, पण आतापर्यंत केवळ ५० स्कूलव्हॅनचालकांनाच परवानगी देण्यात आली आहे. शाळकरी मुलांची वाहतूक करण्यासाठी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांशी वाहनचालकाला करारनामा करणे आवश्यक आहे. आता स्कूलव्हॅन चालकांनी शाळांमध्ये येरझारा सुरू केल्या आहेत. अनेक शाळांनी असे करारनामे करण्यास असमर्थता व्यक्त केल्याने वाहनचालकांची कोंडी झालीच आहे. शिवाय, पालकही संकटात सापडले आहेत.
शहरातील काही शाळांजवळ स्कूलबसेसची व्यवस्था आहे. त्यामुळे या शाळांचा प्रश्न सुटला असला तरी शहरातील बहुतांश शाळांकडे अशी व्यवस्था नसल्याने खाजगी वाहतूकदारांवरच विसंबून राहण्याची पाळी पालकांवर आली आहे. मुलांना शाळेत ने-आण करण्याची जबाबदारी पालकांची आहे. त्यात आम्ही लक्ष घालणार नाही, अशी भूमिका अनेक शाळांनी घेतल्याने हा प्रश्न सुटण्यास अजूनही बराच कालावधी लागेल, हे स्पष्ट झाले आहे. एकीकडे वाहतूक पोलिसांनी स्कूलव्हॅन आणि ऑटोरिक्षांची तपासणी सुरू केली आहे. ऑटोरिक्षातून केवळ चारच मुलांची वाहतूक करण्याची परवानगी आहे. त्यामुळे ऑटोरिक्षाचालकांमध्येही संतापाचे वातावरण पसरले आहे. स्कूलव्हॅनचा अपघात झालेला असताना ऑटोचालकांना का वेठीस धरण्यात येत आहे, हा त्यांचा सवाल आहे. या अपघाताच्या चौकशीसाठी विभागीय आयुक्त डी.आर. बन्सोड यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीने आपला गोपनीय अहवाल शासनाकडे कारवाईसाठी पाठवला आहे.
या अहवालात अपघातासाठी कारणीभूत ठरलेल्या घटकांविषयी निष्कर्ष काढण्यात आहेत. या अहवालानुसार आता कोणावर कारवाई होते, याकडे प्रशासकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, एस.टी. महामंडळाने अपघातासाठी जबाबदार ठरवत, संबंधित एस.टी. बसचालकाला निलंबित केले असून त्याची खातेनिहाय चौकशी सुरू करण्यात आली आहे. प्रादेशिक परिवहन विभागाने आता शाळा पातळीवर परिवहन समित्या गठित करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. यापूर्वी या समित्याच अस्तित्वात नव्हत्या. या समित्यांमध्ये वाहन निरीक्षकांचा समावेश राहणार आहे. आरटीओने त्यासाठी १५ वाहन निरीक्षकांची नावे जाहीर केली असून मुख्याध्यापकांना या वाहन निरीक्षकांशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.     

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: School van accident students trevel problem not sloved

ताज्या बातम्या