वाचन संस्कार २०१४ ग्रंथ प्रदर्शन
जीवनात अनेक घटना घडतात. त्यामुळे जीवन पुढे सरकते. या जीवनाला विज्ञानाचा आधार आवश्यक आहे, लिखीत व प्रात्यक्षिकता एकत्र काम करतील त्याचवेळी देशाची प्रगती होईल, असे प्रतिपादन विज्ञानाचे प्रसिध्द अभ्यासक प्रा. डॉ. श्रीनिवास पाटील यांनी केले. येथील संस्कार प्रज्ञा व लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइड यांच्या वतीने पोलीस कवायत मैदानावर आयोजित ‘वाचन संस्कार २०१४’ या भव्य पुस्तक व ग्रंथ प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्ष गणेश धात्रक, प्रगती बँकेचे संस्थापक अध्यक्ष पन्नालाल शिंगी, लायन्सचे प्रांतपाल मिलींद पोफळे, छत्रे विद्यालयाचे मुख्याध्यापक डी. टी. पवार, संस्कार प्रज्ञा संस्थेचे अध्यक्ष अनिल चव्हाण आदी उपस्थित होते. विविध प्रकारची सुमारे ३५ हजारांवर पुस्तकांची मांडणी हे प्रदर्शनाचे वैशिष्टय़े आहे. ग्रंथालये आणि पुस्तक प्रदर्शन हे ज्ञानसमृद्ध जीवनाची गरज आहे. धकाधकीच्या जीवनातही संपूर्ण ज्ञान आणि अभ्यासासाठी पुस्तकांचे वाचन आवश्यक असल्याचे प्रा. डॉ. पाटील यांनी सांगितले.
यावेळी प्रा. पाटील यांनी विज्ञान व तंत्रज्ञान, मानवी जीवन याची सांगड घालत दिलेल्या व्याख्यानाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. विज्ञानातील बदलत्या घडामोडींचा सापेक्ष आढावा घेतला. प्रसिद्ध शास्त्रज्ञ आइनस्टाइन, न्यूटन यांच्यासह अनेक नामवंत शास्त्रज्ञ कसे घडले याचाही त्यांनी उहापोह केला. जिद्द, चिकाटी, एकाग्रता आणि मानवी जीवनाला चालना देणाऱ्या शिक्षणाच्या अभावामुळे आजही आपण विज्ञानाच्या तळाशी पोहचू शकलेलो नाही. विज्ञान क्षेत्रात एकाही भारतीय शास्त्रज्ञाला नोबेल पारितोषिक मिळालेले नाही. गतवर्षी शास्त्रज्ञांनी देवकण सापडल्याची घोषणा केली होती. यावर त्यांनी स्लाईड शोव्दारे प्रकाश टाकला. याबरोबरच खगोल विज्ञान आणि आकाशदर्शनाचा परिचय करून दिला. गुरूत्वाकर्षणाची शक्ती, ब्रह्मांडाचे गूढ, विश्वाची निर्मिती यावर त्यांनी विवेचन केले. सूत्रसंचालन हर्षद गद्रे यांनी केले.
इंटरनेट, टीव्ही आदी माध्यमांच्या अयोग्य हाताळणीमुळे विद्यार्थी आणि पालकांचे व एकूणच समाजाचे नियमित वाचन करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. वाचन संस्कृतीला चालना मिळावी. पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजावी या उद्देशाने या पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. संस्कार प्रज्ञाचे किशोर परदेशी यांनी प्रास्तविक केले. वाचन संस्कृती वाढावी यासाठी हा एक चांगला उपक्रम असल्याचे नगराध्यक्ष गणेश धात्रक यांनी स्पष्ट केले. विवेक बरडिया, संजय पाटील यांनी उपस्थितांचा परिचय करून दिला. संस्कारक्षम पिढीसाठी पुस्तकांची गरज आहे. आज वाचनसंस्कृती रुजली पाहिजे अशी अपेक्षा पोफळे यांनी व्यक्त केली. यावेळी संयोजकांतर्फे क्रीडा क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी करणारे क्रीडा प्रशिक्षक प्रविण व्यवहारे, राज्य विज्ञान प्रदर्शनातील विजेते संजय वाघ, श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे सचिव पी. पी. धारवाडकर, मुंबई मॅरेथॉनमध्ये यशस्वी सहभाग नोंदविल्याबद्दल डॉ. अजय भन्साळी आदींचा सत्कार करण्यात आला. प्राइडचे अध्यक्ष मंगलेश बाकलीवाल, अनिल चव्हाण आदींच्या हस्ते सत्कार करण्यात आला.