हेल्मेट, सिटबेल्ट न वापरणारे, मोबाईलवर बोलत वाहन चालविणाऱ्या चालकांची शीव येथे मोठीच पंचाईत झाली. शालेय विद्यार्थ्यांनी त्यांच्या गाडय़ा अडवून त्यांनी सुरक्षित वाहतुकीचे नियम समजावून सांगितले. निमित्त होते माटुंगा वाहतूक पोलीस आणि ‘सायन फोरम’ या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या जनजागृती मोहिमेचे.
वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याने होणाऱ्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. पोलीस अशा वाहनचालकांवर कारवाई करत असतात. या वाहन चालकांमध्ये परिणामांची जागृती निर्माण व्हावी यासाठी नुकतीच सायन फोरम आणि माटुंगा वाहतूक पोलिसांनी शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जनजागृती मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेत सायन आणि माटुंगा परिसरातील शाळांमधील पाचशे विद्यार्थी सहभागी झाले होते.
फलक घेऊन या विद्यार्थ्यांनी परिसरातून रॅली काढली आणि वाहनचालकांना वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याने होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती दिली, असे माटुंगा वाहतूक पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजाता पाटील यांनी सांगितले.