राज्य वक्फ महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन. डी. पठाण यांच्या शहरातील भाडय़ाच्या सदनिकेवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला. या वेळी घेतलेल्या झडतीत १९ हजार ८१० रुपये रोख व ३ बँकांची खाते पुस्तिका पोलिसांच्या हाती लागली. पुढील तपासासाठी ती माहिती नांदेडच्या अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आली आहे.
औरंगाबाद, उस्मानाबाद, बीड व जालना येथे वक्फ महामंडळाअंतर्गत बऱ्याच जमिनींचे व्यवहार आहेत. मोक्याच्या ठिकाणी असलेले अनेक भूखंड ९९ वर्षांच्या करारानेही देण्यात आले आहेत. काही जमिनींवर अतिक्रमणे झाली असून पक्की बांधकामे झाली आहेत. या प्रत्येक व्यवहारात हितसंबंध दडले आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी पठाण यांच्या घरी रविवारी १ कोटी १९ लाख रुपये सापडले. ही रोकड मोजण्यासाठी रात्री उशिरा पोलिसांना पैसे मोजण्याचे यंत्र मागवावे लागले. पठाण अंबाजोगाई येथील मूळ रहिवासी असून तेथेही लाचलुचपत विभागाकडून चौकशी केली जात आहे.