काही वर्षांपूर्वी येऊर येथे तस्करीप्रकरणी जप्त केलेली बिबटय़ांची कातडी वनविभागाने गुरुवारी जाळली. जागतिक वन दिनाचे औचित्य साधून वन्य जीवांच्या अवयवांची तस्करी करण्यापासून गुन्हेगारांना परावृत्त करण्यासाठी वनविभागातर्फे हा उपक्रम राबविण्यात आला. १९८०मध्ये ठाण्यातील घोडबंदर रोड येथील पानखंड गावात ३ बिबटय़ांची तस्करी झाली होती. या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली असली तरी बिबटय़ांचा या वेळी मृत्यू झाला होता. या वेळी वन विभागातर्फे बिबटय़ांची कातडी जप्त करण्यात आली होती. या कातडीची पुन्हा तस्करी होऊ नये या उद्देशाने वन विभागाने गुरुवारी ही कातडी जाळली. वन्य प्राण्यांचे अवयव जवळ बाळगणाऱ्या व्यक्तीला ३ ते ५ वर्षांपर्यंतची सक्तमजुरी तसेच २५ हजार रुपयांच्या दंडाच्या शिक्षेची कायद्यात तरतूद असल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या वेळी सांगितले. या वेळी येऊर परिक्षेत्राचे वन अधिकारी सुशांत साळगांवकर, प्रशांत शिंदे आणि अभिमन्यू जाधव उपस्थित होते.