भिवंडी-निजामपूर महापालिका प्रभाग समिती सभापतिपदाची निवड

भिवंडी-निजामपूर महापालिका प्रभाग समिती सभापतिपदाची निवडमहानगरपालिकेच्या प्रभाग समिती सभापतिपदांच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या.

भिवंडी-निजामपूर महापालिका प्रभाग समिती सभापतिपदाची निवडमहानगरपालिकेच्या प्रभाग समिती सभापतिपदांच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या वेळी प्रभाग क्रमांक एकच्या सभापतिपदी शिवसेनेच्या अश्विनी अरुण राऊत, प्रभाग क्रमांक दोनच्या सभापतिपदी काँग्रेसच्या फर्जान इस्माईल मिर्ची, प्रभाग क्रमांक तीनच्या सभापतिपदी भाजपच्या ललिता नितीन बजागे, प्रभाग क्रमांक पाचच्या सभापतिपदी कोनार्क विकास आघाडीचे नितीन रघुनाथ पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली; तर प्रभाग समिती क्रमांक चारसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपच्या योगिता पाटील ६ मतांनी विजयी झाल्या. कोकण विभागीय आयुक्त दिलीप शिंदे यांनी या निवडणुकीचे निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.
भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या प्रभाग समितीच्या निवडणुका शुक्रवारी १३ जून रोजी सकाळी ११ वाजता महानगरपालिकेच्या जुन्या इमारतीमधील सभागृहात घेण्यात आल्या. आयुक्त विजयकुमार म्हसाळ, सचिव कादर सोळंकी हे उपस्थित होते. प्रभाग समिती क्रमांक चार वगळता अन्य सर्व एक ते पाच प्रभागांच्या सभापतिपदाच्या निवडणुका बिनविरोध झाल्या.
प्रभाग क्रमांक चारच्या निवडणुकीत भाजपच्या योगिता अनिल पाटील यांना १२ मते पडली, तर काँग्रेसच्या मोमीन परवेज सिराज अहमद यांना ६ मते मिळाली. त्यामुळे योगिता पाटील यांचा विजय निश्चित झाला. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी विजेत्यांची घोषणा केल्यानंतर महापौर प्रतिभा विलास पाटील यांनी सर्वाचे अभिनंदन केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Selection of bhivandi nijampur division of municipal committee chairman post