कशीश पार्क सोसायटीतील वादाला राजकीय रंग
ठाणे येथील कशीश पार्क सोसायटीमध्ये शिवसेनेच्या दोन गटांमध्ये गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेला अंतर्गत वाद आता उफाळून आला असून याच वादातून सोमवारी रात्री दोन गट आमने-सामने येऊन हाणामारीचा प्रसंग उद्भवला होता. मात्र, ठाणे पोलीस वेळीच घटनास्थळी पोहचल्यामुळे सुदैवाने हाणामारी झाली नाही. विशेष म्हणजे, दोन गटांत वाद सुरू असतानाच सोसायटीच्या आवारात काही अनोळखी तरुणांचे टोळके मोटारसायकलीवरून घिरटय़ा घालत होते. त्यामुळे हे तरुण कोण होते आणि ते सोसायटीत कशासाठी आले होते, याचा सविस्तर तपास करावा, या मागणीसाठी सोसायटीमधील सर्वच इमारतीमधील रहिवाशी खाली उतरल्याने तणावाचे वातावरण होते. त्यामुळे पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केल्यामुळे सोसायटी परिसराला छावणीचे स्वरूप आले होते, अशी माहिती काही रहिवाशांनी दिली.
ठाणे येथील कशीश पार्कमध्ये ३३ इमारती असून त्यामध्ये सुमारे एक हजार घरे आहेत. या पार्कमध्ये कशीश पार्क नावाचे मित्र मंडळ असून त्याचे अध्यक्ष प्रशांत जाधव आहेत. जाधव हे शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते आहेत. तसेच या पार्कमध्ये भारतीय विद्यार्थी सेनेचे प्रदेश पदाधिकारी विकास रेपाळेसुद्धा राहतात. गेल्या काही वर्षांपासून रेपाळे आणि जाधव या दोघांच्या गटात अंतर्गत वाद सुरू आहे. यातूनच फेसबुक या सोशल मिडियावर टाकण्यात आलेल्या प्रतिक्रियेवरून (कमेंट) या दोन्ही गटांतील वाद सोमवारी रात्री हाणामारीपर्यंत पोहचला. मात्र याविषयी माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांसह वागळे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. या दोन गटांत वाद सुरू असताना सोसायटीबाहेरील तरुणांचे टोळके मोटारसायकलवरून सोसायटीच्या आवारात फिरत होते. मात्र, पोलिसांचे पथक येताच हे तरुण मोटारसायकल सोडून पळून गेले. या तरुणांच्या टोळक्यामुळे संतापलेले सोसायटीतील रहिवाशी इमारतीच्या खाली उतरले होते. तसेच विकास रेपाळे यांनी या तरुणांना आणल्याचा संशय व्यक्त करीत रहिवाशांनी त्यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी केली. त्यामुळे या सोसायटीच्या परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते.
दरम्यान, वागळे इस्टेट पोलिसांनी ‘त्या’ तरुणांच्या आठ मोटारसायकली जप्त केल्या असून त्या नेमक्या कुणाच्या आहेत, याची सविस्तर चौकशी सुरू केली आहे, अशी माहिती सोसायटीतील काही रहिवाशांनी दिली. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ए.डी. क्षीरसागर यांच्याशी संपर्क साधला असता, सोसायटीमधील दोन गटांतील अंतर्गत वादातून हे प्रकरण घडले असून घटनास्थळावरून आठ मोटारसायकली जप्त केल्या आहेत. या मोटारसायकलीचे मालक कोण आहेत, याचा शोध घेण्यात येत आहे. तसेच ते मोटारसायकली घेऊन सोसायटीत कशासाठी आले होते, याचीही सविस्तर चौकशी करण्यात येत असून त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
सोसायटीमध्ये आम्ही चांगली कामे करीत असून त्यामध्ये रवींद्र फाटक यांचे समर्थक आडकाठी घालत आहेत. तसेच पोलीस ठाण्यात खोटय़ा तक्रारी करीत आहेत. याशिवाय सोसायटीत राबविलेल्या स्वच्छता मोहिमेसंदर्भात नगरसेविका नम्रता भोसले यांची बदनामी करणारा मजकूर फेसबुकवर टाकण्यात आला होता. याचा जाब विचारण्यात आला असता, हे प्रकरण घडले. याप्रकरणी वागळे पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत, असे विकास रेपाळे यांनी स्पष्ट केले. तसेच बाहेरून कोणत्याही तरुणांना आपण आणले नव्हते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या प्रकरणी प्रशांत जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्या फेसबुकवर टाकण्यात आलेल्या मजकुरामुळे हा वाद निर्माण झाला होता. या वादातून विकास रेपाळे यांनी सोसायटीतील रहिवाशांना मारहाण करण्यासाठी ३० ते ४० गुंडांना आणले होते, असा दावा त्यांनी केला आहे.