कर्नाटकातील अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याच्या निर्णयाविरुद्ध शिवसेनेने आज प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला. ही उंची वाढविल्यास सांगली, कोल्हापूरमध्ये पावसाळय़ात पूरसदृश स्थिती निर्माण होईल यामुळे या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केल्यास शिवसेनेच्या वतीने उग्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
या मोर्चानंतर प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांना शिवसेनेच्या वतीने मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यामध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव म्हटले आहे, की केंद्रीय लवाद समितीने अलमट्टी धरणाची उंची पाच मीटरने वाढविण्याबाबत परवानगी दिली असल्याने कृष्णा-पंचगंगा नदी खोऱ्यात महापुराचा भयावह धोका निर्माण होणार आहे. ही स्थिती लक्षात घेऊन धरणाची उंची कमी करण्याबाबत शासनाने ठोस पावले उचलावीत.
दरम्यान जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, शहरप्रमुख धनाजी मोरे यांच्या नेतृत्वाखाली प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या वेळी शिष्टमंडळाच्या वतीने प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात, २००५ साली आलेल्या महापुराने प्रचंड नुकसान झाले होते. त्याला अलमट्टी धरणच कारणीभूत होते. आता ५१९ मीटर उंची असलेल्या धरणाची उंची पुन्हा पाच मीटरने वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असे झाल्यास पुराची स्थिती कशी उद्भवेल याची कल्पना करणेही कठीण आहे. भविष्यात उद्भवणाऱ्या या समस्येबाबत राज्य शासनाने गांभीर्याने विचार करून अलमट्टी धरणाची उंची पाच मीटरने वाढविण्याचा घेतलेला निर्णय कमी करण्याबाबत ठोस पावले उचलावीत, असे नमूद केले आहे.