मागील तीन वर्षांपासून कामोठे येथील दोनशे जेष्ठ नागरिक सिडको प्रशासनाकडे विरंगुळा केंद्र बांधून मागताहेत, या विरंगुळा केंद्रासाठी सिडकोच्या माजी अध्यक्षांपासून ते सिडकोच्या मिस्टर क्लीन व्यवस्थापकीय संचालकांनी आश्वासने दिली आहेत. पण या विरंगुळा केंद्राची आश्वासनपूर्ती तीन वर्षांनंतरही होऊ शकली नाही. हे ज्येष्ठ नागरिक अजूनही सिडकोची फाईल क्रमांक १२३ (विरंगुळा केंद्र) कधी मंजूर होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल या प्रतीक्षेत आहेत. सिडको वसाहतीमधील सेक्टर-२० आणि ५ येथे हे विरंगुळा केंद्र व्हावे, अशी या ज्येष्ठ नागरिकांची मागणी आहे.
कामोठे वसाहतीमध्ये एकही उद्यान सिडकोने विकसित केले नाही, या वसाहतीमधील जेष्ठ नागरिकांना बसण्यासाठी साधी आसनव्यवस्थाही नाही. या परिस्थितीचे गांभीर्य ज्या वेळी जाणवले त्या वेळी या ज्येष्ठ नागरिकांनी आपली तात्पुरती सोय म्हणून आपली भारतीय बैठक पनवेल-सायन महामार्गालगतच्या पदपथावर केली. तेथे आपल्या हक्काच्या जागेसाठी प्रयत्न करूया ही कल्पना जागृत झाली आणि त्यातून कामोठे जेष्ठ नागरिक संस्थेचा जन्म झाला. त्या वेळी एन. एस करंदीकर, टी आर जनार्दनन, एम के शहा, सर्जेराव कंक, उत्तमचंद रायसोनी, बळवंत वाघमोडे, रवींद्रनाथ राऊत, दीपक भडांगे, निंबा देवरे, के.पी.एल. गुप्ता, किसन भुजबळ, रामचंद्र शिंदे, सरोज सुभेदार, आर. बी. गोपाळे यांनी अग्रेसर होऊन सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांची भेट घेतली.
हिंदुराव यांनी सिडकोमध्ये या विषयाच्या अनुषंगाने विविध विभागातील अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. त्या वेळी हिंदुराव यांनी अनेक अधिकाऱ्यांना आपणही ज्येष्ठ होणार आहोत हे न विसरण्याचा जाहीर सल्ला दिला. बैठकीत हिंदुराव यांनी आठ महिन्याच्या आत विरंगुळा केंद्र बांधू, असे त्या वेळी सूतोवाच केले होते. आठ महिन्यांत आपले हक्काचे केंद्र झाले नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांची घेतली.
भाटिया यांची सिडकोमध्ये ‘मिस्टर क्लीन’ अशी ओळख आहे. त्यांच्या प्रामाणिकपणामुळे ते आपला प्रश्न सोडवतील, अशी अपेक्षा होती. भाटिया यांनीही प्रशासकीय व तांत्रिक अडचणी दूर करून एका वर्षांच्या आत विरंगुळा केंद्र बांधू असे आश्वासन दिले. परंतु त्या विरंगुळा केंद्रात ज्येष्ठांना योगा करावा लागेल, असेही भाटिया यांनी सांगितले. ज्येष्ठांनाही ही संकल्पना आवडली. त्यांनी योगा नक्कीच होईल पण विरंगुळा केंद्र बांधा, अशी मागणी केली. मात्र एक वर्ष पूर्ण होत नाही तोच सिडकोमधून उद्यानात विरंगुळा केंद्र बांधता येत नाही, असे ज्येष्ठ नागरिकांना सांगण्यात आले. अनेकदा या विरंगुळा केंद्राचा आराखडा बदलावा लागला. तेही सिडकोने केले. मात्र प्रत्यक्षात काम कधीही सुरू होऊ शकले नाही. सिडकोमध्ये फोन केला की, साहेब बाहेर आहेत, मी निरोप देतो असे सांगितले जाते. पण प्रत्यक्ष ज्येष्ठांना भाटिया यांना त्यांचे आश्वासनांचे स्मरण करून देण्यासाठी भेटीची वेळ मिळत नाही. सिडकोचे अधीक्षक अभियंता किरण फणसे हे ज्येष्ठांना रस्ता खराब असला की ब्रेक लागतोच, अशी मार्मिक टिप्पणी सिडकोच्या कामकाजाबाबत करतात, असे हे ज्येष्ठ नागरिक सांगतात.
ज्येष्ठांच्या संस्थेने भाटिया यांना शेवटचे पत्र नुकतेच १५ एप्रिलला पाठविले आहे. या ज्येष्ठांना समजले की आपल्या विरंगुळा केंद्राची फाईल अतिरिक्त मुख्य अभियंता बी. के. शमी यांच्याजवळ आहे, या ज्येष्ठांनी शमी यांना दूरध्वनी करून याबाबत चौकशी केली असता आपण रजेवर असल्याचे सांगून माझ्या विभागातील अधिकाऱ्यांशी मी बोलतो असे सांगून आपले हात झटकून घेतात, असे या ज्येष्ठ नागरिकांकडून सांगितले जाते. कामोठे येथे ही ज्येष्ठ मंडळी आता गणपती मंदिराजवळील सिडकोने बसविलेल्या बाकांवर रोज सायंकाळी बसलेली असतात. त्यांचा उत्साह आजही ताजा आहे. ते सिडको वसाहतीमधील सेक्टर-२० आणि ५ येथे आपल्या हक्काचे विरंगुळा केंद्र कधी उभारले जाईल या प्रतीक्षेत आहेत.

Shanthappa Jademmanavar PSI
आईच्या मजुरीचं पांग फेडलंस! UPSC मध्ये सात वेळा नापास झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाची यशाला गवसणी
mumbai, charkop, Architect s Attempt to fraud , fungible carpet area in MHADA Housing, MHADA Housing Societies charkop, redevlopment of mhada socieities, mhada society charkop, chrkop news,
चारकोपमधील म्हाडा पुनर्विकासात फंजीबल चटईक्षेत्रफळाचा घोटाळा, अधिकाऱ्याच्या दक्षतेमुळे अनर्थ टळला!
Transfer, social justice department
सामाजिक न्याय विभागात एकच अधिकारी दहा वर्षांपासून एकाच पदावर, पुन्हा नवीन कार्यभार…
Bhaskar Bhagre and Bharti Pawar
दिंडोरीत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांविरोधात मविआकडून शिक्षक मैदानात