नालेसफाई गाळात ; आयुक्तांची पाठ वळताच परस्थिती जैसे थे..

मान्सून पूर्व स्वच्छतेला प्रथम प्राधान्य देणारे आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांनी मागील महिन्यात केलेल्या दौऱ्यानंतरही नवी मुंबई क्षेत्रातील ऐरोली, घणसोली या भागातील गटार आणि पावसाळी नालेसफाई अद्याप कागदावर राहिली आहे. त्यामुळे अधिक मनुष्यबळ लावून ही कामे येत्या चार दिवसांत करण्याचे आदेश …

मान्सून पूर्व स्वच्छतेला प्रथम प्राधान्य देणारे आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांनी मागील महिन्यात केलेल्या दौऱ्यानंतरही नवी मुंबई क्षेत्रातील ऐरोली, घणसोली या भागातील गटार आणि पावसाळी नालेसफाई अद्याप कागदावर राहिली आहे. त्यामुळे अधिक मनुष्यबळ लावून ही कामे येत्या चार दिवसांत करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. पालिकेच्या या स्वच्छता मोहिमेवर विरोधी पक्षनेत्या सरोज पाटीलदेखील नाराज असून, ही स्वच्छता जनतेच्या डोळ्यात धूळफेक करणारी असून, केवळ ६० टक्के स्वच्छता करण्यात आली आहे. त्यामुळे पावसाळ्यात लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. नवी मुंबई पालिका क्षेत्रात ५६४ किलोमीटरची गटारे, जेमतेम तेवढय़ाच किलोमीटरचे रस्ते आणि ७४ किलोमीटर अंतराचे पावसाळी नाले असून त्यांची पावसाळ्यापूर्वी स्वच्छता केली जाते. नवी मुंबई ही भौगोलिकदृष्टय़ा इतर शहरांपेक्षा वेगळी असून डोंगर आणि खाडीच्या मधील पृष्ठभागावर हे शहर वसले आहे. त्यामुळे पावसाळ्यात डोंगरातून येणारे पाणी आणि भरतीच्या वेळी खाडीतून येणाऱ्या समुद्राच्या पाण्याला थोपविण्याची मोठी जबाबदारी पालिकेला पार पाडावी लागत आहे. सिडकोने डोंगर दऱ्यातून येणाऱ्या पाण्याला वाट करून देण्यासाठी पावसाळी नाले बांधलेले आहेत, तर समुद्राच्या भरतीच्या पाण्याला थांबविण्यासाठी डच पद्धतीचे पॉन्ड बांधण्यात आले आहे. हे सर्व पावसाळ्यापूर्वी स्वच्छ करणे आवश्यक आहे. या भौगोलिक रचनेची जाणीव असलेल्या आयुक्तांनी पावसाळ्यापूर्वीच्या स्वच्छतेला प्रथम प्राधान्य दिले असून, सीबीडी ते दिघा या १०० किलोमीटर अंतराचा दौरा केला आहे. तरीही आयुक्तांची पाठ वळताच अनेक ठिकाणी स्थिती जैसे थे असल्याचे दिसून येत आहे. पाऊस आता तोंडावर आलेला असताना अनेक ठिकाणी गटारातून काढलेला गाळ उचलण्यात आलेला नाही. त्यामुळे कडक उन्हात सुकलेला हा गाळ पुन्हा त्याच गटारात गेल्याची उदाहारणे आहेत. या वर्षी आयुक्तांनी काही ठिकाणी गटारात तसेच नाल्यात उतरून पाहणी केल्याने दरवर्षीपेक्षा यावर्षी गाळ जास्त निघाल्याचे दिसून आले. त्यासाठी अडगळीत पडलेले पेरीस्कोप नावाचे यंत्रदेखील यावर्षी पहिल्यांदाच वापरण्यात आलेले आहे. गाळ जास्त निघाल्याने तो अनेक वर्षांचा साचलेला गाळ होता. यापूर्वी कागदावर गाळ काढल्याचे दाखवून बिले वसूल करण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. गटाराबाहेर काढण्यात आलेला गाळ काही ठिकाणी उचलण्यात आला नसल्याची कबुली उपायुक्त बाबासाहेब रांजळे यांनी दिली. हे काम युद्धपातळीवर केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. गाळ काढल्यानंतर तेथे पिवळी खूण करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. मान्सून पूर्वच्या कामात रस्ताची डागडुजी करण्याचे काम केले जात आहे, मात्र ही डागडुजी अक्षरश: मलमपट्टी ठरत असल्याचे दिसून येते. एमआयडीसीत तर अंतर्गत रस्त्यांची स्थिती यावर्षीदेखील जैसे थे असून काही ठिकाणी डांबरीकरण करण्याचे नाटक केले जात आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sewer cleaning work in navi mumbai on paper

Next Story
जेएनपीटीचे नवे विकास पर्व