‘शकुंतला’ असे नामाभिधान दिलेल्या अचलपूर-मूर्तीजापूर-यवतमाळ या नॅरोगेज रेल्वेमार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याच्या प्रस्तावावर राज्य सरकारकडून प्रतिसाद देण्यात न आल्याने हे काम अडल्याची माहिती समोर आली आहे. आता हे काम केंद्र आणि राज्याच्या संयुक्त सहभागातून करण्याची मागणी करण्यात आली आहे. या रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण ९ वर्षांपूर्वी करण्यात आले तेव्हा ब्रॉडगेज रूपांतरासाठी ५०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता, तो आता १५५१ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
काही वर्षांपूर्वी ब्रॉडगेज रूपांतरासाठी संसदेच्या याचिका समितीच्या माध्यमातून प्रकरण सादर करण्यात आले होते. त्यानंतर गेल्या वर्षी मार्चमध्ये रेल्वे मंत्रालयाने राज्य शासनाकडे एक प्रस्ताव पाठवला. त्यात राज्य शासनाने हा रेल्वेमार्ग ब्रॉडगेज करण्यासाठी लागणारी जमीन विनामूल्य द्यावी आणि प्रकल्पाच्या एकूण खर्चाच्या ५० टक्के रक्कमही उपलब्ध करून द्यावी, असे त्यात कळवण्यात आले होते, पण या प्रस्तावावर राज्य सरकारच्या वतीने प्रतिसाद देण्यात आला नाही, म्हणून हा मार्ग ब्रॉडगेज होणे शक्य नाही, असे रेल्वे मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले. तत्कालीन रेल्वेमंत्री डी.व्ही. सदानंद गौडा यांनी अमरावतीचे खासदार आनंदराव अडसूळ यांना गेल्या १७ ऑक्टोबरला पाठवलेल्या पत्रातून ही बाब उघड झाली आहे.
अचलपूर ते यवतमाळपर्यंत ११३ किलोमीटरच्या या  ब्रिटिशकालीन रेल्वेमार्गाकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले आहे. १९१६ पासून क्लिक निक्सन या इंग्लंडमधील कंपनीच्या ताब्यातील हा रेल्वेमार्ग काही वर्षांपूर्वी भारतीय रेल्वेकडे हस्तांतरित झाला आहे. हा मार्ग ब्रॉडगेज झाल्यास अचलपूर, दर्यापूर तालुक्यातील प्रवासी हे थेट मध्य रेल्वेशी जोडले जातील. मूर्तीजापूर ते अचलपूर हा रेल्वेमार्ग ब्रॉडगेजद्वारे चांदूर बाजार-नरखेड रेल्वे मार्गाला जोडून पहिल्या टप्प्यात केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त सहभागातून ब्रॉडगेजच्या कामाला मंजुरी द्यावी, अशी मागणी खासदार आनंदराव अडसूळ यांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून केली आहे.
अमरावती, अकोला आणि यवतमाळ या तीन जिल्ह्यांमधून जाणाऱ्या शकुंतला रेल्वेचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर व्हावे, ही अनेक वर्षांची मागणी आहे. १९९६ पर्यंत या रेल्वेगाडीला वाफेवर चालणारे इंजिन होते. त्यानंतर डिझेल इंजिन लावण्यात आले. शतकोत्तरी प्रवास करणाऱ्या या रेल्वेमार्गावर आता अडचणीचे डोंगर आहेत. अनेक ठिकाणी पूल खचले आहेत. रेल्वेमार्गाची डागडुजी, देखभाल केली जात नाही. रेल्वे स्थानकांच्या इमारती मोडकळीस आल्या आहेत. अनेक वेळा ही रेल्वे बंद असते. संथगतीने चालणारी शकुंतला रेल्वे वाहतुकीची साधने वाढल्यानंतर आणि रस्त्यांचे जाळे तयार झाल्यानंतर उपेक्षित झाली.
राज्याने तत्वत: मान्यता द्यावी – अडसूळ
शकुंतला रेल्वे मार्ग ब्रॉडगेज व्हावा, अशी जुनी मागणी आहे. राज्य सरकारने सहकार्य केल्यास या मार्गाचा विकास होऊ शकेल. पहिल्या टप्प्यात मूर्तीजापूर ते अचलपूर हा रेल्वेमार्ग चांदूर बाजार-नरखेड रेल्वेमार्गाला जोडला जावा, या प्रकल्पाला राज्य सरकारने त्वरित तत्वत: मान्यता द्यावी, अशी मागणी खासदार आनंदराव अडसूळ यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.