मॉर्निग वॉकहून, तसेच मंदिरात दर्शन घेऊन परतणारे गुजराती मतदार घरी जाण्यापूर्वी मतदान केंद्रात हजेरी लावत होते. हळूहळू दिवस चढू लागला आणि काही निवडक मतदारसंघांमधील मतदान केंद्रांमध्ये गुजराती मतदारांचा टक्का वाढू लागला. गुजराती मतदारांची संख्या लोकसभा निवडणुकीइतकी नसली तरी याही वेळी ती नजरेत भरण्याजोगीच होती.  सकाळी साडेसात-आठच्या सुमारास गुजराती मतदारांची उपस्थिती चांगलीच वाढत असल्याचे दिसताच शिवसेना, काँग्रेस उमेदवारांची धावपळ सुरू झाली. मग ‘आपल्या हक्काच्या’ मराठी मतदारांना उतरविण्यासाठी मराठी उमेदवारांनी आपापल्या कार्यकर्त्यांना पिटाळायला सुरुवात केली. दहिसर, बोरिवली, दक्षिण मुंबई आदी विभागांमध्ये गुजराती मतदार घोळक्याघोळक्याने मतदानासाठी घराबाहेर पडताना दिसत होते. गुजराती मतदार स्वत:हून मतदानासाठी उतरत होते. पण मराठी मतदारांना मतदानासाठी बोलवावे लागत होते. त्यामुळे भर दुपारी उन्हाचे चटके सहन करीत शिवसैनिक आणि काँग्रेस कार्यकर्त्यांना धावपळ करावी लागत होती.