तालुक्यातील १५२ गावांची खरीप हंगामातील पिकांची पैसेवारी ५० पैशांच्या आत असताना महसूल खात्याच्या चुकीच्या सव्‍‌र्हेमुळे २१ गावांची पीक आणेवारी ५० पैशांपेक्षा अधिक लावण्यात आल्याने या गावांवर भरपाई देताना अन्याय होणार आहे. त्यामुळे नवीन सव्‍‌र्हे करून संपूर्ण तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख कारभारी आहेर यांनी केली आहे.
गेल्या वर्षी पाऊस उशिरा आल्याने खरीप पेरणीस उशीर झाला होता. तसेच पीक ऐन दाणे भरण्याच्या स्थितीत असताना पावसाने उघडीप घेतल्याने पिकांची वाढ व उत्पन्नात घट झाली. त्यामुळे तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. ऐन हिवाळ्यात काही गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागली आहे. असे असताना महसूल खात्याने केलेल्या सव्‍‌र्हेमध्ये १५२ महसूल गावांपैकी १३१ गावांची पीक पैसेवारी ५० पैशांच्या आत दाखविली आहे. तर, कळवण बुद्रुक, मानूर, कळवण खुर्द, भुसणी, जिरवाडे, नवीबेज, जुनीबेज, निवाणे, भेंडी, बगडू, पिळकोस, भादवण, गांगवण, विसापूर, बिजोरे, चाचेर, नाकोडे, पाटविहीर, वाडी बुद्रुक, अभोण, कळमथे, दह्य़ाने, पाळे या गावांची पीक पैसेवारी ५० पैशांपेक्षा अधिक दाखविल्याने या गावांवर अन्याय होणार असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत.
तालुक्यास सतत चार वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसत आहे. दर वर्षी हातातोंडाशी येणाऱ्या पिकांच्या वेळी कधी अवकाळी पाऊस तर कधी गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शासन स्तरावर बैठका होतात. पिकांचे पंचनामे होतात. परंतु शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडत नाही. यंदाही खरिपाचा सव्‍‌र्हे झाला. परंतु या सव्‍‌र्हेत तालुक्यातील १५२ पैकी १३१ गावांची पैसेवारी ५० पैशांच्या आत तर २१ गवांची पीक पैसेवारी ५० पैशांच्या वर दाखविली जात असल्याने या २१ गावांतील शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे. शासनाने या २१ गावांतील खरिपाचा सर्वे नव्याने करून त्याचाही समावेश ५० पैशांच्या आत करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी कारभारी आहेर यांनी केली आहे.