शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात बुधवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून शिवसेनाप्रमुखांच्या निधनानंतर ही पहिलीच जयंती असल्याने त्यात कोणतीही कसूर राहू नये यासाठी शिवसैनिक सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे पहावयास मिळत आहे. या दिवशी नाशिकमध्ये अभिवादन सोहळा, व्यंगचित्र प्रदर्शन, शालेय साहित्याचे वाटप असे कार्यक्रम होणार आहेत. तर धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघात भगवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
जयंतीच्या निमित्ताने शिवसैनिकांनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. जयंतीचे औचित्य साधून नाशिक जिल्हा शिवसेनेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमांना पक्ष सचिव आ. विनायक राऊत, आ. बबन घोलप, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, माजी महापौर नयना घोलप, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, पालिकेतील विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर, गटनेते अजय बोरस्ते आदी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. बाळासाहेब जसे उत्तम वक्ते होते, तसेच अफलातून व्यंगचित्रकारही. हे लक्षात घेऊन शिवसेनेने नाशिकरोड येथील कोठारी कन्या विद्यालयाच्या मैदानात व्यंगचित्र प्रदर्शन आयोजित केले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन राऊत यांच्या हस्ते सायंकाळी पाच वाजता होणार आहे. तत्पुर्वी, सकाळपासून विविध कार्यक्रम होतील, अशी माहिती शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून देण्यात आली. सकाळी सिडकोतील व्ही. एन. नाईक महाविद्यालयात शिक्षण मंडळ सचिव माणिक सोनवणे यांच्यावतीने वह्या व पुस्तके वाटप केले जाणार आहे. पंचवटी शाखेच्यावतीने पंचवटी कारंजा येथे अभिवादन सोहळा होणार आहे. अमृतधामलगतच्या बिडी कामगार नगरात अन्नदान व साई भंडारा होईल.
महिला आघाडीच्या उत्तर महाराष्ट्र संघटक सत्यभामा गाडेकर यांच्या वतीने जेलरोड येथील उत्सव मंगल कार्यालयात निबंध व व्यंगचित्र स्पर्धा होणार आहे. सकाळी ११ वाजता जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात शिवसेनाप्रमुखांच्या प्रतिमेचे पूजन केले जाणार आहे. अंबड येथील महापालिकेच्या शाळेत तानाजी फडोळ यांच्यातर्फे शालेय वस्तू वितरण, सातपूर आयटीआय सिग्नल जवळील प्रबोधिनी शाळेत मतिमंद मुलांना धान्य व वस्तू वाटप असे कार्यक्रम होणार असल्याची माहिती शिवसेनेकडून देण्यात आली.
उत्तर महाराष्ट्रात या निमित्त विविध कार्यक्रम होणार आहेत. धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेतर्फे २३ ते २९ जानेवारी या कालावधीत भगवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अंतर्गत विकास कामांचे उद्घाटन, शाखा उद्घाटन, श्रमिकांचा सपत्निक सत्कार, रक्तदान शिबीर, गुणवंत गौरव, कुस्ती स्पर्धा आदींचा समावेश आहे. याबाबतची माहिती आ. प्रा. शरद पाटील, उपजिल्हाप्रमुख अरविंद जाधव, हिलाल माळी यांनी दिली. जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बुधवारी तालुक्यातील प्रत्येक गावातील शाखेवर सकाळी आठपासून ग्रामदेवता व मारूती मंदिराची स्वच्छता करून सामुदायिक आरती होईल. त्यानंतर गावातील वयोवृद्धांचा शिवसैनिकांच्यावतीने सत्कार केला जाणार आहे. गुरूवारी नेर येथे शिवसेना शाखा उद्घाटन तर लामकानी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात फळ वाटप, शुक्रवारी सकाळी दहा वाजता कापडणे येथे व्हॉलीबॉल स्पर्धा, शनिवारी न्याहळोद येथे कुस्ती स्पर्धा व अवधान येथे प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धा, धनूर येथे कीर्तन, २७ जानेवारीला नावरा येथे कीर्तन, २८ जानेवारी रोजी जिल्हा परिषद शाळेतील मुलांना खाऊ वाटप व सांस्कृतिक कार्यक्रम २९ जानेवारीला बोरकुंड येथे तालुक्यातील १०० गावांतील १०० वयोवृद्ध सालदारांचा सपत्निक सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात येईल. याच दिवशी शिरूड येथे युवा सेनेतर्फे निबंध स्पर्धा होणार आहे.