करवीर निवासिनी महालक्ष्मी देवीला अर्पण करावयाच्या साडय़ा, ओटीचे साहित्य, श्रीफळ आदी साहित्य बुधवारी रंकाळा तलावाच्या एका बाजूला उघडय़ावर टाकण्याचा प्रकार घडला. या प्रकारामुळे शिवसैनिक संतप्त झाले. धार्मिक भावना दुखावण्याचा हा प्रकार असून त्याची चौकशी व्हावी, अशी मागणी जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी व्यक्त केली.
विशेष म्हणजे या प्रकारामुळे धार्मिक तेढ होऊ न देता शिवसैनिकांनी या साहित्याचे पंचगंगा नदीमध्ये विसर्जन केले. ख्यातनाम अभिनेते राज कपूर यांच्या पुतळय़ाच्या बाजूस सरनाईक वसाहत येथे एक मोकळा प्लॉट आहे. ही जागा दलदलीची आहे. या जागेमध्ये देवीला अर्पण करायच्या साडय़ा, ओटी, श्रीफळ असे साहित्य कोणीतही आणून टाकले होते. एक ट्रॉली भरेल इतके साहित्य बिनदिक्कतपणे उघडय़ावर टाकले होते. हा प्रकार शिवसेनेचे उपप्रमुख माजी नगरसेवक दत्ता टिपुगडे यांच्या निदर्शनास आला. त्यांनी ही माहिती शिवसैनिकांना दिली.
घटनास्थळी जिल्हाप्रमुख विजय देवणे, बंडा साळोखे, हर्षल सुर्वे, संदीप पाटील, सुधीर राणे, रणजित मगदूम, नगरसेविका अरुणा टिपुगडे आदी शिवसैनिक तसेच काही हिंदुत्ववादी कार्यकर्ते जमले. नागरिकांनीही या ठिकाणी गर्दी केली होती. हा प्रकार पाहून शिवसैनिक संतापले. त्यांनी हे साहित्य गोळा करण्याचे काम सुरू केले. त्यामध्ये काही नव्या साडय़ा असल्याचे पाहून सर्वाना आश्चर्य वाटले. विशेष म्हणजे या जागेच्या ठिकाणी जमिनीचे सपाटीकरणाचे काम चालू होते. त्याचा चिखलही या साहित्याच्या बाजूला पडत होता. हा सर्व प्रकार भावना दुखावणारा असून शिवसैनिकांनी कमालीचा संयम राखला. त्यांनी पूजेसाठी वापरले जाणारे हे सर्व पवित्र साहित्य नदीमध्ये विसर्जित करण्याचा निर्णय घेतला. या प्रकाराबद्दल जिल्हाप्रमुख देवणे म्हणाले, विनाकारण धार्मिक तेढ निर्माण होऊ नये, यासाठी शिवसैनिकांनी संयम राखला आहे. हा प्रकार देवस्थान समिती, तेथील स्टॉलधारक, श्रीपूजक यांच्या गलथान प्रकारामुळे झाला आहे. या सर्वाच्या मिलीभगतमुळे मंदिरातील पूजेच्या साहित्यात कसा गैरव्यवहार होतो व भक्तांची आर्थिक पिळवणूक केली जाते, याचा पर्दाफाश शिवसेनेने आंदोलनाद्वारे केला होता. तरीही त्यांच्यामध्ये सुधारणा घडलेली नाही. यासारखा प्रकार पुन्हा घडल्यास दोषींना शिवसेना स्टाईल धडा शिकवण्यात येईल. देवस्थान समिती जिवंत आहे का, असा प्रश्न हा सर्व प्रकार पाहून निर्माण झाला असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.