शिवसेनेच्या ‘गर्जा महाराष्ट्र माझा’चे विदर्भवाद्यांना रोमांचकारी प्रत्युत्तर

स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी विदर्भवाद्यांनी १ मे या महाराष्ट्र दिनी एकीकडे ‘जय विदर्भ’ चा नारा देऊन रास्ता रोको आंदोलन

स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी विदर्भवाद्यांनी १ मे या महाराष्ट्र दिनी एकीकडे ‘जय विदर्भ’ चा नारा देऊन रास्ता रोको आंदोलन करून सत्तारूढ नेत्यांचे पुतळे जाळून विदर्भाचे झेंडे फडकवलेले असतांनाच दुसरीकडे अखंड महाराष्ट्राचा संदेश देण्यासाठी ‘िहदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे विचार मंच व रास्ता बहुउद्देशीय संस्था’ यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र दिनीच शिवव्याख्याते व नाटककार प्रा. नितीन बानुगडे पाटील यांच्या ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हा धडाकेबाज कार्यक्रम येथील पोस्टल ग्राउंडवर आयोजित करून विदर्भवाद्यांना एकप्रकारे आव्हानच दिल्याचे चित्र पहायला मिळाले. विदर्भवाद्यांच्या आंदोलनात सहभागी झालेल्यांची मोजकी संख्या आणि शिवसेनेच्या नेत्यांच्या उपस्थितीतील संध्याकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत चाललेल्या ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ कार्यक्रमाला झालेली खचाखच गर्दी पाहता आयोजकांनी विदर्भवाद्यांवर जबर मात केल्याच्या अनुभवाने शिवेसना नेत्यांचे चेहरे कमालीचे प्रफुल्लीत झाले होते. महसूल राज्यमंत्री संजय राठोड, खासदार भावना गवळी, माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर, बाबू पाटील जैत, शिवसेना जिल्हाप्रमुख माजी आमदार विश्वास नांदेकर, उपप्रमुख परमानंद अग्रवाल, संपर्क प्रमुख प्रवीण पांडे, संतोष ढवळे, राजेंद्र गायकवाड, श्रीधर मोहोड, पराग इंगळे, संजय रंगे, गजानन डोमाळे, किशोर इंगळे आदी शिवसेना नेत्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. ‘गर्जा महाराष्ट्र माझा’चे प्रमुख कलाकार, लेखक, नाटककार, तसेच शिवसेनेचे सातारा-सांगली जिल्ह्य़ाचे सेना संपर्कप्रमुख प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराजांच्या जीवनचरित्रांचे दाखले देत महाराष्ट्राचे ऐक्य ऐतिहासिकदृष्टय़ा किती महत्वाचे आहे, हे सांगतांना महाराष्ट्राला इतिहास आहे, तर इतर प्रांताना भूगोल आहे, असे सांगितले.
जो महाराष्ट्राच्या वाटय़ा जातो, नादाला लागतो त्यांचा औरंगजेब होतो. महाराष्ट्राची महती अशी आहे की, ज्याला संघर्ष झेपावतो त्यालाच येथे यश मिळते. वाघिणीची जी पिले जन्मतच संघर्ष करू शकत नाही, अशा पिलांना जगण्याचा अधिकारच नाकारून वाघिणी त्यांचा नाश करते. हे उदाहरण देऊन त्यांनी हजारो श्रोत्यांच्या प्रचंड टाळ्या घेतल्या. या अत्यंत रोमांचकांरी कार्यक्रमाचे संचालन शिवसेना नेते प्रवीण पांडे यांनी केले.
डोळ्यात अश्रू व अंगावर काटा  
संयुक्त महाराष्ट्र निर्मितीच्या वेळी मुंबईत झालेल्या हुतात्मा क्रांतीचा प्रसंग त्यांनी अशा शब्दात उभा केला की, श्रोत्यांच्या डोळ्यात अश्रूही तरळले आणि अंगावर शहारे आणि काटाही उभा राहिला. अखंड महाराष्ट्राची झालेली निर्मिती बलिदानातून झाली आहे. हे बलिदान व्यर्थ होणार नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.  ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या कार्यक्रमाला श्रोत्यांनी दिलेली प्रचंड उत्स्फूर्त दाद म्हणजे विदर्भवाद्यांच्या मागणीला शिवसेनेने दिलेले अखंड महाराष्ट्राच्या कायम ऐक्याचे उत्तर असल्याची भावना अनेकांनी शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्याकडे व्यक्त केल्याचे समजते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Shivsena garja maharahstra majha