कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुका दहा महिन्यांवर येऊन ठेपल्याने मनाजोगे काम न करणारा आयुक्त महापालिकेत आला तर काय करायचे, या विवंचनेत असलेल्या शिवसेनेच्या नेत्यांनी महापालिका आयुक्त रामनाथ सोनावणे यांची बदली रोखण्याचे जोरदार प्रयत्न सुरू केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. कल्याण महापालिकेत आयुक्त म्हणून बऱ्याच वर्षांनी ‘आयएएस’ दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती झाली आहे. या नियुक्तीचे शहरातील सुजाण रहिवाशांकडून एकीकडे स्वागत होत असताना मावळत्या आयुक्तांना मुदतवाढ कशी मिळेल, यासाठी सत्ताधाऱ्यांच्या गोटात प्रयत्न सुरू झाले अहेत. राज्यात आणि कल्याणमध्ये शिवसेना व भाजपचीच सत्ता असल्याने शहरात विकासकामांचे पाट वाहतील, असा आशावाद व्यक्त केला जात असताना बदली झालेल्या आयुक्तांना मुदतवाढ मिळावी यासाठी सुरू झालेल्या प्रयत्नांमागे नेमके कुणाचे हित दडले आहे, असा सवालही उपस्थित होऊ लागला आहे.   
‘आयएएस’ आयुक्तामुळे भंबेरी
नवीन येणारे आयुक्त सुशील खोडवेकर ‘आयएएस’ असल्यामुळे पालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवक, पदाधिकाऱ्यांची भंबेरी उडाली आहे. सात ते आठ वर्षांनंतर प्रथमच पालिकेला ‘आयएएस’ दर्जाचा आयुक्त मिळत आहे. यापूर्वीच्या ‘आयएएस’ आयुक्तांचा दणकेबाज आणि गतिमान कारभार नगरसेवकांनी अनुभवला असल्याने, ‘आयएएस’ आयुक्त नको रे बाबा’ अशी सर्वपक्षीय नगरसेवक, विशेष करून शिवसेना नगरसेवकांची अवस्था झाली आहे.
पालिकेत सेनेची सत्ता आहे. गेली सहा ते सात वर्षांत आयुक्तांना हाताशी धरून मनाजोगती कामे करणे, करवून घेणे, पालिकेतील सत्ता कशी टिकेल यासाठी व्यूहरचना आखणे असले ‘उद्योग’ शिवसेनेच्या पदाधिकारी, नेत्यांनी केले आहेत. पालिकेतील निविदा प्रक्रिया, विकासकामांमधील नेत्यांचा पडद्यामागील सहभाग याविषयीच्या अनेक तक्रारी शासन पातळीवर प्रलंबित आहेत.
काही तक्रारी बाहेर आल्याने पालिका अधिकारी या चौकशीच्या फौजदारी प्रक्रियेत अडकत चालले आहे. अशा अवस्थेत मनासारखे ऐकणारा आयुक्त नसेल, तर पालिका निवडणुकीच्या तोंडावर गंभीर पेचप्रसंग निर्माण होईल, अशी भीती सेनेच्या पदाधिकाऱ्यांना वाटत आहे.
पडद्यामागून भाजपचे काही लोकप्रतिनिधी, नगरसेवकही सोनवणे पालिकेत राहावेत म्हणून देव पाण्यात घालून बसले आहेत. या मंडळींना त्यांच्या नेत्यांची जरब वाटत असल्याने ते उघडपणे बदली रोखण्याच्या फंदात पडत नसल्याचे बोलले जाते.
सर्वागीण विचार करून शासनाने सोनवणे यांच्या बदलीचा निर्णय घेतला आहे. त्यांची बदली स्थगित करणे किंवा रोखण्यासाठी शिवसेना अजिबात प्रयत्नशील नाही. पालिकेचा कारभार समर्थपणे, गतिमान आणि पारदर्शकपणे करण्यासाठी तडफदार आयएएस अधिकाऱ्याची पालिकेला गरज आहे. शिवसेना शासन निर्णयाचे स्वागत करते. सोनावणे यांची बदली रद्द व्हावी यासाठी पालकमंत्री एकनाथ िशदे अजिबात प्रयत्नशील नाहीत.
गोपाळ लांडगे, शिवसेना जिल्हाप्रमुख, कल्याण.
सोनावणे यांचा मंत्रालयात तळ
पालिका आयुक्त पदावरून बदली होताच आणि नवीन नियुक्ती न मिळाल्याने रामनाथ सोनवणे यांनी गेल्या काही दिवसांपासून मंत्रालयात तळ ठोकल्याची चर्चा आहे. सोनवणे यांनी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा पाटणकर, विकास आयुक्त श्रीकांत सिंग व अन्य अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र सर्व शक्ती पणाला लावून सोनवणे यांची बदली रद्द, स्थगित कशी होईल यासाठी रात्रीपर्यंत किल्ला लढवला असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. यासाठी सेनेचे पक्षप्रमुख, मुख्यमंत्री यांच्यापर्यंत शब्द टाकण्यात आल्याचे समजते.