स्वामी विवेकानंद यांच्या एकशेपन्नासाव्या जयंतीवर्षांच्या शुभारंभानिमित्त कराड शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. स्वामी विवेकानंद सार्धशती समारोह संयोजन समितीसह अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, युवक कल्याण प्रतिष्ठान, जनकल्याण प्रतिष्ठान, सनातन संस्था तसेच शालेय विद्यार्थी शोभायात्रेत बहुसंख्येने सहभागी झाले होते.
शहराच्या प्रमुख दत्त चौकातील छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या पुतळय़ापासून शोभायात्रेस प्रारंभ झाला. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुरलीधर मुळूक यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद यांच्या पालखीचे पूजन करण्यात आले. या वेळी डॉ. प्रकाश सप्रे, शिरीष गोडबोले, डॉ. श्रीकृष्ण ढगे, चंद्रशेखर देशपांडे, राजाभाऊ मंगसुळीकर, हिंदू एकताचे प्रदेश उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ नगरसेवक विनायकराव पावसकर, कराड पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे सभापती हणमंत पवार, भाजपचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. भरत पाटील, जिल्हा सरचिटणीस विष्णू पाटसकर, नीतिश देशपांडे, डॉ. राजेंद्र कंटक, विद्या पावसकर, अरुण जाधव, विजयराव जोशी यांच्यासह महिला व तरुणवर्ग शोभायात्रेत उत्स्फूर्तपणे सहभागी झाला होता.
शोभायात्रेत अ. भा. विद्यार्थी परिषद, युवक कल्याण प्रतिष्ठान, सनातन संस्था यांचे चित्ररथ सहभागी झाले होते. तसेच यशवंत बँक, वनवासी कल्याण आश्रम, शिवाजी हायस्कूल, विठामाता हायस्कूल, महाराष्ट्र हायस्कूल, संजीवनी विद्यामंदिरचे विद्यार्थी सहभागी झाले होते. वाजतगाजत व घोषणाबाजी करत शोभायात्रा दत्त चौकातून मुख्य बाजारपेठेने मोठय़ा दिमाखात निघाली. पांढरीचा मारुती मंदिराजवळ शोभायात्रेची सांगता करण्यात आली.