एलबीटी कराला विरोध दर्शविण्यासाठी सलग दुसऱ्या दिवशी शहरातील बहुतांशी दुकाने बंद राहिली. तर रात्री शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सदानंद कोरगावकर यांनी स्टार बझार हे व्यापारी संकुल बंद पाडले. या वेळी आंदोलक व पोलिसांत किरकोळ झटापट झाली.
एलबीटी कराच्या विरोधात शहरातील व्यापाऱ्यांनी शुक्रवारपासून बेमुदत बंदचे आवाहन केले आहे. या बंदला आजही व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला. त्यामुळे शहरातील दुकाने दिवसभर बंद राहिली.     
टाकाळा परिसरामध्ये स्टार बझार हे व्यापारी संकुल सुरू होते. बंदमध्ये त्याचा सहभाग नसल्याने सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास या संकुलाला आंदोलकांनी लक्ष केले. आमदार राजेश क्षीरसागर, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सदानंद कोरगावकर, शिवसेनेचे दुर्गेळ लिंग्रज, सुनील जाधव यांच्यासह शंभरावर विक्रेते, शिवसैनिक यांनी स्टार बझारकडे कूच केली. आंदोलक प्रवेशद्वारावर आल्यानंतर मुख्य दरवाजा बंद करण्यात आला. शिवसैनिकांनी तो ढकलून आत जाण्याचा प्रयत्न केला. नंतर पोलीस व आंदोलकांत किरकोळ झटापट झाली.    
आमदार क्षीरसागर व कोरगावकर यांनी टाटा एंटरप्रायझेसच्या वतीने चालविल्या जात असलेल्या स्टार बझारच्या व्यवस्थापनाशी चर्चा केली. एलबीटी करा अंतर्गत सर्व व्यापार बंद असताना त्याला तुमच्याकडूनही सहकार्य करावे, असे आवाहन केले. व्यवस्थापनाने त्यास दुजोरा दिला. पाठोपाठ व्यवस्थापनाने मॉलमध्ये असणाऱ्या ग्राहकांना बाहेर जाण्यास सांगितले. खरेदी केलेल्या ग्राहकांची बिले अदा करण्यात आल्यानंतर मॉल बंद करण्यात आला. त्यानंतर आंदोलक तेथून परतले.