इचलकरंजी शहरातील ५० हजार यंत्रमाग कामगारांना ४० दिवस कामबंद आंदोलनाचा संघर्ष केल्यानंतर तब्बल ४८ टक्के इतकी विक्रमी मजुरीवाढ मिळाली. आंदोलन संपून दोन आठवडे होत आले तरी हजारो कामगारांचा आनंद क्षणभंगूर ठरला आहे. कामगार संघटनांनी तयार केलेला मजुरीवाढीचा तक्ता आणि यंत्रमागधारक संघटनांनी तयार केलेला मजुरीवाढीचा तक्ता यामध्ये मजुरीत मोठा फ़रक पडला असल्याने श्रमिकांच्या घामाचे योग्य मूल्य होताना दिसत नाही. पीकनिहाय प्रतिमीटर मजुरीमध्ये ३ पैशापासून ते १३ पैशापर्यंत इतका प्रचंड फ़रक पडलेला आहे.  हलक्या कापडाच्या क्वालिटीस जादा मजुरी आणि भारी कापडाच्या क्वालिटीस कमी मजुरी असे विसंगत चित्र निर्माण झाल्याने विसंवाद निर्माण झाला आहे. उद्या शुक्रवारी होणारा पगार तरी वाढीव मजुरीप्रमाणे मिळणार का या प्रष्टद्धr(२२४)्नााने यंत्रमाग कामगारांना ग्रासले आहे.
इचलकरंजीतील यंत्रमाग कामगारांना दरमहा १० हजार रुपये वेतन किंवा दररोज ४०० रुपये मजुरी असा आकर्षक लढय़ाचा मथळा घेऊन यंत्रमाग कामगार संघटना संयुक्त कृती समितीने जानेवारी महिन्यात उग्र आंदोलन छेडले. महागाईमुळे पिचलेला कामगारही कामबंद आंदोलनात तब्बल ४० दिवस नेटाने उभा राहिला. आंदोलनाची सांगता होताना निश्चित वेतनाचा मुद्दा मागे पडला परंतु कामगारांना मजुरीवाढीत ४८ टे इतकी भरघोस वाढ मिळाली. आतापर्यंतच्या ३०-४० वर्षांच्या कामगारांच्या आंदोलनात किमान ३ पैसे तर कमाल ७ पैसे प्रतिमीटर इतकी वाढ झाली होती. या तुलनेत यावेळची वाढ विक्रमी ठरल्याने कामगारांनीही गुलालाची उधळण करीत आनंदोत्सव साजरा केला होता. मात्र या आनंदाला गालबोट लागण्यास सुरुवात झाली असून कामगारांना अपेक्षित मजुरीवाढ मिळू न शकल्याने त्यांच्यात तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
आंदोलनाची सांगता झाल्यानंतर कामगार संघटना कृती समितीने मजुरीवाढीचा तक्ता बनविला होता. तर त्यानंतर तीन-चार दिवसांनी यंत्रमागधारकांच्या पाच संघटनांनी दुसराच तक्ता बनविला होता. या दोन्ही तक्त्यामध्ये मीटरनिहाय मजुरीवाढीत खूपच अंतर आहे. कामगारांनी बनविलेला तक्ता हा जादा मजुरीचा असल्याचा आक्षेप कारखानदारांचा आहे. तर यंत्रमागधारक संघटनांनी बनविलेला तक्ता हा पदरात कमी माप टाकणारा आहे अशी तक्रार कामगारांची आहे. ५२ पिकाला प्रतिमीटर ८७ पैसे मजुरी देण्यास कामगार व यंत्रमागधारक यांच्यात एकमत आहे. मात्र पुढे कापडाची क्वॉलिटी वाढत जाईल तसतसा मजुरीमध्ये फ़रक पडत चालल्याचे कामगारांचे म्हणणे आहे.
५६ पिकाला कामगारांनी ९४ पैसे तर कारखानदारांनी ९१ पैसे मजुरी देण्याचे ठरविले असून त्यामध्ये प्रतिमीटर ३ पैशाचा फ़रक पडत चालला आहे. याच आलेखानुसार ६० पिकाला ५.५ पैसे, ६४ पिकाला ८ पैसे, ६८ पिकाला १० पैसे, ७२ पिकाला ११.५ पैसे, ७६ पिकाला १२ पैसे फ़रक पडला आहे. तर ८० पिकाला कामगारांच्या मते १३४ पैसे मजुरी मिळाली पाहिजे. तर कारखानदार १२१ पैसे मजुरी देण्यास राजी असल्याने त्यामध्ये १३ पैशाचा फ़रक पडत आहे. आतापर्यंत यंत्रमागधारक व कामगार प्रतिनिधींच्या तीनवेळा बैठका होऊनही एकमत झालेले नाही. मजुरीत ३ ते १३ पैसे इतका फ़रक राहिल्याने प्रत्येक आठवडय़ास कामगाराच्या मजुरीत ४५ ते १८७ रुपये असा मोठा फ़रक पडत चालल्याने कामगारांतून संतप्त सूर व्यक्त होऊ लागला आहे.
याशिवाय वेगवेगळ्या प्रकारच्या कापडाच्या प्रकारामध्येही मजुरीत लक्षणीय फ़रक आहे. धोतीच्या मजुरीत कामगारांनी १० पैसे, तर कारखानदारांनी ५ पैसे जादा देण्याची तयारी दर्शविली आहे. पिसी पॉलिस्टर, सिफॉन, कार्बन, पीव्ही वगैरे प्रकारच्या कापडामध्ये कामगारांना ३० पैसे मजुरीवाढ अपेक्षित असून यंत्रमागधारक १० पैसे वाढ देण्यास तयार आहेत. १२० इंची माग, डॉबी, नक्षी, सुरत साडी, बुटा साडी या क्वालिटीस प्रतिपीक ४ पैसे मजुरीवाढ अपेक्षित असून यंत्रमागधारक मात्र ३ पैसे देण्याच्या मन:स्थितीत आहेत. ५० इंचाच्या पुढील पन्न्यास प्रत्येक इंचास ३ पैसे मजुरीवाढ मिळावी असे कामगारांचे म्हणणे असताना यंत्रमागधारक १ पैसा वाढ देण्यास अनुकूल आहेत. याशिवाय जॉबर, दिवाणजी, कांडीवाला,हेल्पर, चेकर यांच्या मजुरीवाढीबाबत अजून कसलीच चर्चा नसल्याने मजुरीवाढ प्रकरणी सावळा गोंधळ निर्माण झाला आहे. मजुरीवाढीचा हत्ती पुढे गेला असला तरी त्याचे शेपूट अडकले असून ते यंत्रमागधारक व कामगार या दोघांनाही त्रासदायक ठरत आहे.