कुपोषणाच्या गंभीर प्रश्नासाठी ओळखल्या जाणाऱ्या मेळघाटात वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने रुग्णालयांच्या दुरुस्ती व नूतनीकरणासाठी तब्बल १.९४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. लाखो रुपये खर्चून इमारतींची डागडुजी केली जात असतानाच या रुग्णालयांमध्ये कायमस्वरूपी डॉक्टर्स उपलब्ध करून देण्यासंदर्भात मात्र शासनाने कोणतीही उपाययोजना केलेली नाही. 

मेळघाटातील कुपोषण दूर करण्याच्या नावाखाली आजवर विविध प्रयोग करून झाले असले तरी येथील आरोग्यव्यवस्था सुधारण्यासंदर्भात कायमस्वरूपी परिणामकारक उपाययोजना अंमलात आणण्यात अद्याप यश आलेले नाही. आरोग्य व्यवस्थेचे फायदे मेळघाटातील दुर्गम भागात पोहोचविण्यासंदर्भात कितीही ओरड होत असली तरी प्रत्यक्षात मात्र आजही या भागातील आदिवासींना अनेक आरोग्य सुविधा वस्तुस्थिती आहे.
आता, ही यंत्रणा मजबूत करण्याच्या नावाखाली राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने मेळघाटातील चिखलदरा, धारणी व चुर्णी येथील शासकीय रुग्णालयांच्या दुरुस्ती व नूतनीकरणासाठी १.९४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. नुकताच या बाबतचा शासन निर्णय आरोग्य खात्याने जाहीर केला आहे. चुर्णी येथील ग्रामीण रुग्णालयाच्या दुरुस्ती व नूतनीकरणासाठी ९२.७५ लाख रुपये, ग्रामीण रुग्णालय, चिखलदरा येथे ९२.०९ लाख रुपये व धारणी येथील उपजिल्हा रुग्णालयातील याच कामासाठी ९६.२१ लाख रुपये शासनाने मंजूर केले आहेत. याव्यतिरिक्त, चुर्णी रुग्णालयाच्या परिसरातील निवासस्थानांच्या दुरुस्ती व नूतनीकरणासाठी ४६.६६ लाख रुपयेसुद्धा आरोग्य विभागाने मंजूर केले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे या बांधकामांची जबाबदारी राहणार असून हा खर्च राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाच्या माध्यमातून भागविण्यात येणार आहे.
दरम्यान, रुग्णालय इमारतींवर लाखो रुपये खर्च करत असतानाच या इमारतींमध्ये रुग्णांना सुविधा देण्यासाठी पूर्ण वेळ डॉक्टर्सदेखील शासनाने आता उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी या भागात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी केली आहे. चुर्णी येथील रुग्णालय बांधकामासाठी यापूर्वीदेखील २ कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले होते. मात्र, आजही चुर्णीसह धारणी व चिखलदरा या दोन्ही ठिकाणी पूर्णवेळ बालरोगतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ तसेच सोनोग्राफी यंत्रणा उपलब्ध नाही. अनेकवेळा, मागणी करूनही मेळघाटच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या या तीनही ठिकाणी पूर्णवेळ डॉक्टर्स नियुक्त केलेले नाही. जोवर पूर्णवेळ डॉक्टरांची नियुक्ती या तीनही ठिकाणी होत नाही, तोवर केवळ बांधकामे केल्याने काहीही साध्य होणार नसल्याचे गेल्या अनेक वर्षांपासून या भागात काम करणारे ‘खोज’ संस्थेचे बंडय़ा साने यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच मेळघाटचा दौरा करणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्या पाश्र्वभूमीवर पूर्णवेळ तज्ज्ञांची या भागात नियुक्ती व्हावी, अशी मागणी आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या मेळघाटातील कार्यकर्त्यांनी केली आहे.