अत्याधुनिक सरकते जिने बसवल्यामुळे आधुनिक रेल्वे स्थानक असा लौकिक मिरविण्याचा प्रयत्न करणाऱ्या ठाणे स्थानकात स्वच्छतागृहांचा प्रश्न मात्र अतिशय गंभीर आहे. दहा फलाट असणाऱ्या या स्थानकात केवळ दोनच स्वच्छतागृहे चालू अवस्थेत असून ही दोन्ही स्वच्छतागृहे फलाट क्रमांक दोन या एकाच फलाटावर आहेत तर नव्याने बांधण्यात येणारे पहिलेवहिले वातानुकूलित स्वच्छतागृहही फलाट क्रमांक दोनवरच बांधण्यात येत आहे. त्यामुळे एकाच फलाटावर तीन स्वच्छतागृह तर अन्य नऊ फलाटांवर मात्र स्वच्छतागृहांची वानवा असा अजब प्रकार ठाणे स्थानकात पाहायला मिळत आहे.
उपनगरी रेल्वेच्या किमान तासभराच्या प्रवासानंतर अनेक प्रवाशांना नैसर्गिक विधीसाठी स्वच्छतागृहाची आवश्यकता भासते. दहा फलाटांच्या ठाणे स्थानकांमध्ये केवळ तीन स्वच्छतागृहे आहेत. त्यापैकी दोन स्वच्छतागृहे फलाट क्रमांक दोनवर व एक स्वच्छतागृह फलाट क्रमांक दहावर आहे. मात्र फलाट क्रमांक दहावरील स्वच्छतागृह आता बंद करण्यात आले आहे. त्यामुळे ठाणे स्थानकातील सर्व प्रवाशांना फलाट क्रमांक दोनवरील स्वच्छतागृहांचा आसरा घ्यावा लागतो. प्रवाशांना अधिक सुविधा देण्यासाठी मध्य रेल्वेच्या वतीने खासगी संस्थेच्या सहभागातून वातानुकूलित स्वच्छतागृहाचा घाट घातला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून या वातानुकूलित स्वच्छतागृहाचे बांधकाम सुरू असून अखेरच्या टप्प्यात आले आहे.
हे नवे तिसरे स्वच्छतागृहही फलाट क्रमांक दोनवरच असून कल्याणच्या दिशेला असलेल्या स्वच्छतागृहापासून केवळ काही पावलांवरच आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी दोन-दोन स्वच्छतागृह रेल्वे प्रशासानाने प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिले आहेत.
एकाच फलाटावर तीन स्वच्छतागृहे उपलब्ध असताना अन्य नऊ फलाटांवर मात्र स्वच्छतागृहांची वानवाच आहे. लांब पल्ल्याच्या गाडय़ा जात असलेल्या चारपाच आणि सहासात या फलाटांवर तर एकही स्वच्छतागृह नाही. त्यामुळे या फलाटांवर गाडय़ांची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना उघडय़ावर मूत्रविसर्जन करण्याशिवाय पर्यायच नाही. प्रवासी संघटनांच्या वतीने वारंवार याविषयी आवाज उठवला जात असूनही प्रशासन उदासीन आहे. अपुऱ्या आणि अस्वच्छ स्वच्छतागृहांमुळे महिला प्रवाशांची फारच कुचंबणा होते. त्यामुळे त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे, अशी माहिती उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाचे नंदकुमार देशमुख यांनी दिली.

नव्या स्वच्छतागृहाची जागाही चुकलेली..
फलाट क्रमांक दोनवर दोन स्वच्छतागृह असल्याने किमान तिसरे स्वच्छतागृह अन्य एखाद्या फलाटावर असणे गरजेचे होते. नव्या स्वच्छतागृहाची जागा चुकली. त्याचा प्रवाशांना फारसा फायदा होणार नाही, अशी प्रतिक्रिया प्रवासी संघटनेचे पदाधिकारी राजेंद्र विशे यांनी दिली.

स्वच्छतागृहे हवीत स्थानकाबाहेर
रेल्वेकडे मर्यादित जागा असून या जागेचा वापर केवळ रेल्वे प्रवाशांच्या प्रवासासाठी करण्याचा आमचा प्रयत्न असतो. त्यामुळे प्रत्येक फलाटांवर स्वच्छतागृह उभारणे रेल्वेला शक्य नाही. रेल्वे स्थानकाबाहेर अशी व्यवस्था आवश्यक असून स्थानिक महापालिकांनी त्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. मात्र आपल्याकडे एकाही स्टेशनबाहेर महापालिकांचे स्वच्छतागृह नसून केवळ रेल्वेकडूनच अपेक्षा केली जाते, अशी प्रतिक्रिया रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी दिली. सरासरी दर चार मिनिटाला आम्ही लोकल सोडतो. प्रत्येक स्थानकाबाहेर स्वच्छतागृह असेल, तर प्रवाशांना त्याचा लाभ घेता येईल, असेही ते म्हणाले.