उत्सवप्रिय सोलापुरात ग्रामदैवत सिद्धेश्वर यात्रेसह विविध उत्सवांमध्ये हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्याचे प्रस्थ वाढले असून, त्याचे लोण आता मोहरम उत्सवापर्यंत पोहोचले आहे. राष्ट्रवादीचे माजी उपमहापौर अप्पाशा म्हेत्रे यांच्या वतीने मोहरमच्या ‘शहादत’दिनी, शुक्रवारी भारतीय चौकात थोरल्या आणि धाकटय़ाा तलवार पंजांच्या भेटीच्या सोहळय़ाप्रसंगी हेलिकॉप्टरमधून प्रथमच पुष्पवृष्टी केली जाणार आहे. मात्र या उपक्रमाकडे उत्सवप्रियतेचा अतिरेक म्हणून पाहिले जात आहे.
चार वर्षांपूर्वी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ग्रामदैवत सिद्धेश्वर यात्रेत अक्षता सोहळय़ाप्रसंगी भाजपचे नेते अ‍ॅड. शरद बनसोडे यांनी सर्वप्रथम हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली होती. त्यानंतर या उपक्रमाचे अनुक्रम अन्य उत्सवांतही होऊ लागले. आतापर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक, गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक, पद्मशाली समाजाचे कुलदैवत श्री मरकडेय रथोत्सव आदी उत्सवांमध्ये हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यानंतर आता हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्याविषयीचे आकर्षण मोहरम उत्सवातही वाढले. त्यातूनच माजी उपमहापौर अप्पाशा म्हेत्रे यांच्या वतीने व शहर मोहरम समितीच्या सहकार्याने येत्या शुक्रवारी मोरहमच्या ‘शहादत’दिनी भारतीय चौकात दुपारी ३ वाजता इमाम हसन व इमाम हुसेन (थोरले तलवार पंजे व धाकटे तलवार पंजे) यांच्या भेटीच्या सोहळय़ाप्रसंगी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली जाणार आहे. तत्पूर्वी जिंदाशा मदार चौकातही मिरवणुकीवर पुष्पवृष्टी होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय चौकात थोरल्या व धाकटय़ा तलवार पंजांच्या भेटीच्या सोहळय़ाप्रसंगी हजारो भाविकांच्या साक्षीने उंचावरून पुष्पवृष्टी केली जात होती. आता हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी केली जाणार असली तरी हा अंधानुकरणाचा भाग असल्याची प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत.