पुणे, गोव्याकडे दिवसाला जाणाऱ्या लाखो वाहनांना वरदान ठरणारा सायन-पनवेल या महामार्गावरील दहा पदरी रुंदीकरण व सिमेंट क्राँक्रिटीकरणचे काम अंतिम टप्प्यात असून येत्या पंधरा दिवसांत हा विस्तारित मार्ग पूर्ण करून तो वाहतुकीसाठी खुला करण्याचा प्रयत्न सार्वजनिक बांधकाम विभाग युद्धपातळीवर करीत आहे. त्यामुळे या मार्गावर होणारी वाहतूक कोंडी पावसाळ्यापूर्वी सुटणार आहे. या मार्गावर होत असलेला खर्च वसूल करण्यासाठी खारघर येथे लावण्यात येणाऱ्या टोल नाक्याबाबत मनसेच्या धसक्यामुळे मात्र अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याने दिली.
मुंबईहून पुणे व गोव्याकडे जाणाऱ्या वाहनांना सायन पनवेल महामार्गावर पाच-सहा वर्षांपूर्वी मोठय़ा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. त्यात पनवेल, नवी मुंबईचे नागरीकरण झपाटय़ाने वाढल्याने मुंबईतून या शहरामध्ये ये-जा करणाऱ्या वाहनांच्या संख्येतही वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईतून पनवेलपर्यंत वाहन चालविणाऱ्या चालकांचा जीव कासावीस होत होता. पनवेलनंतर पुण्याला जाण्यासाठी मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेमुळे एक ते दीड तासाचा कालावधी पुरेसा असताना मुंबईहून निघालेल्या वाहनचालकाला पनवेलपर्यंतच येण्यासाठी दोन ते तीन तासांचा वेळ या वाहतूक कोंडीमुळे लागत होता. त्यावर उपाय म्हणून सायन-पनवेल महामार्गाचे दहा पदरी रुंदीकरण करणे हेच असल्याचा अभिप्राय सार्वजनिक बांधकाम विभागाने शासनाला दिला होता. त्यानुसार ‘बांधा, वापरा, हस्तांतरण करा’ या तत्त्वावर हे बांधकाम देण्यात आले असून त्यासाठी १२२० कोटी रुपये खर्च झाला आहे. दोन वर्षांपूर्वी हे काम सुरू करण्यात आले आहे, पण या रुंदीकरण व क्राँक्रिटीकरणासाठी लागणाऱ्या खर्चाची तोंडमिळवणी करताना बांधकाम कंपनीला नाकीनऊ आल्याने हे काम प्रस्तावित वेळेपेक्षा नऊ महिने उशिरा सुरू करण्यात आले. त्यानंतरही कामाला चांगला वेग देण्यात आला असून पाच उड्डाण पुलांची निर्मिती करण्यात आली आहे. उशिरा काम सुरू होऊनही काम पूर्ण करण्याचा कालावधी मे २०१४ आहे. त्यामुळे कामाचा वेग आता वाढला आहे. बेलापूर खिंडीजवळील व सानपाडा रेल्वे स्थानकासमोरील उड्डाणपुलाचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. हार्डिलिया कंपनीजवळील छोटा उड्डाण पूल आता दोन्ही बाजूने वाहतुकीस खुला करण्यात आला असून बेलापूर खिंडीजवळील उड्डाण पुलाच्या कामामुळे या ठिकाणी थोडा वेळ वाहतूक कोंडी होत आहे, पण रस्ता रुंद झाल्याने ही कोंडी जास्त वेळ जाणवत नाही. बेलापूरची सुप्रसिद्ध खिंड या रुंदीकरणामुळे नामशेष झाली असून तिचे अकरा मीटरचे रुंदीकरण पूर्ण झाले आहे. पूर्वी या खिंडीत आल्यानंतर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे मुंबई नवी मुंबईत आल्याची जाणीव वाहनचालकांना होत होती. सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या पुकारसारख्या चित्रपटांचे या खिंडीत पूर्वी चित्रीकरण झाल्याने ती नावारूपास आली होती. त्यानंतर अनेक चित्रपटांचे या ठिकाणी चित्रीकरण झालेले आहे. रस्ता रुंदीकरणात ही खिंड दहा मीटर कापल्याने तिचे अस्तित्व आता संपले आहे. या रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या पावसाळी गटारांचेही काम या वर्षी करण्यात आले आहे. गतवर्षी नेरुळ येथे या गटारांची कामे न केल्याने डोंगरातून आलेले पाणी साचल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे या मार्गावरुन ये-जा करणाऱ्या वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत होता. ती समस्या या वर्षी जाणवणार नाही, असा विश्वास बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आहे. हा मार्ग वाहतुकीस पूर्णपणे खुला करावा यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग कसोशीने प्रयत्न करीत असून काही ठिकाणी रात्रंदिवस काम सुरू आहे. त्यामुळे येत्या पंधरा दिवसांत हा रस्ता खुला करण्याचा आमचे प्रयत्न असल्याचे कार्यकारी अभियंता आर. के. आगवणे यांनी सांगितले.

टोल लांबणीवर
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस- राष्ट्रवादी पक्षाला चांगलाच फटका बसल्याने सायन-पनवेल महामार्ग रुंदीकरणासारखी लोकोपयोगी कामे लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आदेश संबंधित मंत्र्यांनी दिले आहेत. त्यामुळे शासकीय यंत्रणा अंग झटकून कामाला लागली असून टोलसारख्या वादग्रस्त विषयांना तूर्त तिलांजली देण्यात आली आहे. त्यामुळे विधासभेच्या निवडणुका होईपर्यंत तरी खारघर येथे सायन पनवेल महामार्गासाठी लागणारा टोल लांबणीवर पडला आहे.