जि. प. च्या शाळेचे मुख्याध्यापक नेहमीच गैरहजर राहात असल्याने विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीकडे लक्ष वेधण्यासाठी औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळा येथील ग्रामस्थांनी गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनातच शाळा भरविली. याची तत्परतेने दखल घेत शिक्षणाधिकाऱ्यांनी तातडीने नवीन शिक्षकांची नेमणूक केली व गैरहजर मुख्याध्यापकाबाबत अहवाल पाठविण्याचा आदेश गटशिक्षण अधिकाऱ्यांना दिला.
पिंपळा गावात जि. प. ची पहिली ते चौथीपर्यंत शाळा आहे. शाळेत ५५ पेक्षा अधिक विद्यार्थी आहेत. मुख्याध्यापक विश्वनाथ कऱ्हाळे व शिक्षिका कुशावर्ता पवार हे दोघेच या शाळेत आहेत. मात्र, मुख्याध्यापक सतत गैरहजर राहात असल्याने विद्यार्थ्यांची शैक्षणिक परवड होत आहे. त्यामुळे या मुख्याध्यापकाची बदली करून त्यांच्या जागी नवीन शिक्षक नेमावा, अशी मागणी ग्रामस्थांनी शिक्षण विभागाकडे वारंवार केली. मात्र, त्याकडे शिक्षण विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे ग्रामस्थांनी बुधवारी सरळ औंढा पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये शाळा भरविली. या आंदोलनाने एकच खळबळ उडाली. शिक्षणाधिकारी शिवाजी पवार यांनी दखल घेऊन पिंपळा शाळेवर नवीन शिक्षकांची नेमणूक केली. तसेच सतत गैरहजर राहणाऱ्या मुख्याध्यापक कऱ्हाळे यांच्या कार्यपद्धतीची चौकशी करून अहवाल पाठविण्याचे आदेश गटशिक्षण अधिकाऱ्यांना दिले.