जेजे स्कूल ऑफ फाइन आर्टच्या आवारात मंगळवारी एक अनोखा व्यक्तिचित्र सोहळा पाहायला मिळणार असून भारतभरात असा प्रयोग प्रथमच होत आहे. भारतातील तीन प्रख्यात व्यक्तिचित्रणकार एकमेकांचे व्यक्तिचित्र रसिकांसमोर एकाच वेळेस प्रात्यक्षिकाद्वारे सादर करणार आहेत. म्हणजे रसिकांना तीन उत्तम चित्रकार चित्रण करताना एकाच वेळेस पाहायला मिळतील.. यात वासुदेव कामत, सुहास बहुळकर आणि अनिल नाईक यांचा समावेश आहे. महत्त्वाचे म्हणजे हे तीन चित्रकार तीन वेगवेगळ्या माध्यमांमध्ये काम करणारआहेत हे विशेष! म्हणजे बहुळकर अॅक्रेलिकमध्ये, कामत सॉफ्ट पेस्टल, तर अनिल नाईक हे जलरंगामध्ये व्यक्तिचित्रण प्रात्यक्षिक सादर करतील.
हे प्रात्यक्षिक सादर होत असताना माध्यमांचे आणि त्या माध्यमांतील चित्रणाचे बारकावे रसिकांसमोर सहज उलगडत जातील. भारतात अशा प्रकारचा प्रयोग प्रथमच होणार आहे. त्यामुळे या अनोख्या प्रयोगाकडे कलारसिकांचे डोळे लागून राहिले आहेत. दुपारच्या जेवणानंतरच्या सत्रामध्ये हे तिन्ही चित्रकार, शिवाय जेजे कला महाविद्यालयाचे अधिष्ठाता विश्वनाथ साबळे हे व्यक्तिचित्रण कलेवर विद्यार्थी आणि रसिकांशी संवाद साधतील.
ही कल्पना प्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामत यांना सुचलेली आहे. त्याबद्दल ते म्हणतात, २००६ साली जगातील सवरेत्कृष्ट व्यक्तिचित्रकाराचा सन्मान मिळाला त्या वेळेस अमेरिकेत हे लक्षात आले की, जगभरात व्यक्तिचित्रणाच्या लोकप्रियतेसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहेत, तेही कलावंतांकडून. आपल्याकडेही असेच काही तरी करावे म्हणून पुढाकार घेतला. त्यासाठी फेसबुकसारख्या सोशल मीडियाचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला.
कामत सरांच्या नेतृत्वाखाली पोर्ट्रेट आर्टिस्ट्स ग्रुपची स्थापना करण्यात आली. त्यात काही प्रथितयश तर काही नवोदित चित्रकारांचाही समावेश होता. ठरले असे की, वर्षभर चालणारी अशी एक व्यक्तिचित्रण स्पर्धा आयोजित करायची. त्याचे निकष काटेकोरपणे ठरविण्यात आले. प्रसिद्ध चित्रकार प्रकाश घाडगे, प्रदीप राऊत, सुनील पुजारी, शरद तावडे, भारती कामत, साहेबराव हारे आदी कलावंतांनी मदत केली. संपूर्ण ग्रुपने त्यानंतर कामत सरांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण वर्षभर रेखीव पद्धतीने काम केले.
इंटरनेटवर सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून फेसबुकचा वापर करण्यात आला आणि मग पोर्ट्रेट आर्टिस्ट्स ग्रुपचे फेसबुक पेज तयार करण्यात आले. त्यावरूनच आवाहन करून नियमावली देऊन कलावंतांना दर महिन्याला त्यांनी केलेले नवीन व्यक्तिचित्रण पाठविण्याचे आवाहन करण्यात आले. दर महिन्याला साधारणपणे ४० नवीन व्यक्तिचित्रे सादर व्हायची. मग कामत सरांसोबत बसून आणखी एक चित्रकलातज्ज्ञ किंवा समीक्षक यांच्या परीक्षणानंतर त्या महिन्यातील उत्कृष्ट व्यक्तिचित्रणाची निवड करून ती फेसबुक पेजवरच जाहीर केली जायची. १२ महिने झाले की, त्यानंतर एक मोठा सोहळा असणार एवढेच त्या वेळेस सांगण्यात आले होते. या उपक्रमाला आता एक वर्ष पूर्ण झाले.
दर महिन्याला साधारण ४० व्यक्तिचित्रे सादर होत होती. त्यातील १० जण नेहमी चित्रण सादर करणारे होते. तर साधारणपणे ३० चित्रकार नवे असायचे. बनारस, कोलकाता, कर्नाटक आदी ठिकाणांहूनही चांगला प्रतिसाद मिळाला. केवळ एवढेच नव्हे तर देशभरात व्यक्तिचित्रण करणाऱ्या कलावंतांचा एक संवादही सुरू झाला, वासुदेव कामत सांगतात.
या सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच ३१ डिसेंबर रोजी या वर्षभर आयोजित स्पर्धेतील विजेत्या कलावंतांसाठी विशेष स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, त्यामध्ये या सर्व कलावंतांचा कस लागणार आहे. ही स्पर्धा खुल्या पद्धतीने होणार आहे. उपस्थित रसिक आणि विद्यार्थ्यांसमोर या १२ विजेत्या कलावंतांना व्यक्तिचित्रण प्रत्यक्षात करायचे आहे. साधारणपणे समोर मॉडेल आल्यानंतर प्रत्येक जण आपल्याला सोयीची अशी जागा पकडतो आणि चित्रणाला सुरुवात करतो. या कलावंतांमधील कस पणाला लागावा यासाठी या स्पर्धेप्रसंगी मॉडेलच्या बाजूला १२ जागा निश्चित करण्यात आल्या असून, त्यात कोणत्या कलावंताने कोणत्या जागेवर बसायचे याचा निर्णय चिठ्ठय़ा टाकून सोडतीच्या पद्धतीने केला जाणार आहे. त्यामुळे उपलब्ध आणि निश्चित केलेल्या जागेवरूनच कलावंतांना त्यांचे प्रात्यक्षिक करावे लागेल. ३१ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता या अनोख्या स्पर्धेला सुरुवात होईल. दुपारी १.३० वाजेपर्यंतचा वेळ व्यक्तिचित्रणासाठी देण्यात आला आहे. ३ मॉडेल्स आणि १२ महिन्यांचे १२ विजेते, त्यांनी साकारलेली १२ व्यक्तिचित्रे असा हा सोहळा रंगणार आहे. यातील सवरेत्कृष्ट व्यक्तिचित्रकाराला तब्बल ७५ हजार रुपयांचा वासुदेव कामत पुरस्कार, उपविजेत्याला ५० हजार रुपये आणि तृतीय क्रमांकाला २५ हजार रुपयांचा पुरस्कार सन्मानचिन्हांसह मिळणार आहे. त्याचप्रमाणे उर्वरित ९ प्रत्येक महिन्याच्या विजेत्यास प्रत्येकी १५ हजार रुपयांचा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणारआहे. व्यक्तिचित्रण कलेच्या प्रचार आणि प्रसारार्थ एवढा मोठा पुरस्कार देणारा हा पहिलाच उपक्रम आहे.
यानिमित्ताने चित्ररसिकांना व विद्यार्थ्यांना एक मोठी चित्रपर्वणीच उपलब्ध झाली आहे. रसिकांना हा कार्यक्रम विनामूल्य खुला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 30th Dec 2014 रोजी प्रकाशित
जेजेमध्ये अनोखा व्यक्तिचित्र सोहळा रंगणार !
जेजे स्कूल ऑफ फाइन आर्टच्या आवारात मंगळवारी एक अनोखा व्यक्तिचित्र सोहळा पाहायला मिळणार असून भारतभरात असा प्रयोग प्रथमच होत आहे.

First published on: 30-12-2014 at 06:11 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sketches exhibition at j j school of art