‘मॅड कॉमेडी’ हा प्रकार बॉलीवूडमध्ये रोहित शेट्टीच्या चित्रपटांमुळे रुजू लागलाय. परंतु,  ‘सिंघम’ अजय देवगणच्या चित्रपटातून ही मॅड कॉमेडी अजिबात शोभून दिसत नाही. अजय देवगणने प्रामाणिकपणे अभिनय केला असला तरी ‘सरदारजी’ हा विनोदाचाच विषय आहे यापलीकडे चित्रपट काहीही सिद्ध करीत नाही. बिनडोक विनोदपट म्हणूनही काही एक दर्जा देण्यापासून चित्रपटाला वंचितच ठेवावे लागेल.
चित्रपटाच्या शीर्षकावरूनच मसाला मनोरंजन असेल या आशेने प्रेक्षक चित्रपटगृहात पाय ठेवतो खरा. परंतु, मसाला मनोरंजन तर सोडाच अतिशय भडक सादरीकरण, भडक अभिनय यामुळे  सोनाक्षी सिन्हाचे सौंदर्य आणि जुही चावलाचा प्रसन्न वावर एवढे सोडले तर चित्रपटात काही पाहण्यासारखे आहे का असेच म्हणावेसे वाटेल. अजय देवगणचा चित्रपट म्हणजे निश्चितपणे चांगला असणार वगैरे या भावनेने प्रेक्षक चित्रपटगृहात जातो, पण हे तथाकथित मनोरंजन पाहून खजील न झाला तरच नवल.
सरदारजी जस्सी सिंग (अजय देवगण) हा लंडनमध्ये राहणारा तरुण आपल्या पूर्वजांची जमीन विकण्यासाठी पंजाबमधील फगवाडा या आपल्या जन्मगावी परत येतो. तिथे बिल्लू पाजी (संजय दत्त) याने आपल्या काकाची हत्या करणाऱ्या जस्सीच्या कुटुंबातील शेवटचा वंशज अर्थात जस्सी याला संपविल्यानंतरच लग्न करण्याची शपथ घेऊन बसलेला आहे. जस्सीला शोधायचे कसे हा त्याच्यासमोरचा प्रश्न आहे. ‘खानदानजी इज्जत’ पणाला लावणारा बिल्लू पाजी हा फगवाडामधील सर्वाधिक वजनदार माणूस ऊर्फ गुंड आहे. परंतु, गुंडांचेपण ‘उसूल’ असतात हिंदी चित्रपटात. घराण्याची इज्जत ही सवरेतपरीने जपण्यासाठी आपण उचललेला विडा पूर्ण करून दाखविल्याशिवाय लग्न करायचे नाही असे बिल्लू पाजी ठरवितो. शत्रू खानदानाचा जस्सी सहजपणे आपल्या फगवाडामधील घरी येईल आणि आपण आपली शपथ पूर्ण करू असे त्याला कधीच वाटत नाही. परंतु, अचानकपणे जस्सी आयताच बिल्लू पाजीच्या तावडीत सापडतो. एवढेच नव्हे तर पाहुणा म्हणून बिल्लू पाजीच्या घरातच येतो. पण ‘अतिथी देवो भव’ हा ‘उसूल’ असल्यामुळे जस्सीला मारण्यासाठी बिल्लू पाजी आणि त्याचे दोन भाऊ टिटू (विंदू दारासिंग) आणि टोनी (मुकुल देव) संधीच्या शोधात असतात. दरम्यान बिल्लू पाजीची लाडकी बहीण सुखमित (सोनाक्षी सिन्हा) आणि जस्सी यांचे प्रेम जुळते. पण सरदारजी असल्यामुळे बहिणीच्या प्रेमापेक्षाही आपण घेतलेली शपथ महत्त्वाची आहे असे बिल्लू पाजीला वाटत असते. या शपथेमुळे बिल्लू पाजी हा पमी (जुही चावला) हिच्याशी लग्न करीत नाही. परंतु, ‘मूँह बोली बायको’ म्हणून ती राहते. जस्सी एकदा का घरातून बाहेर पडला की त्याचा खात्मा करण्यासाठी बिल्लू पाजी गावातील अख्खी फौज तलवारी आणि बंदुका घेऊन उभी करतो. पण जस्सी वारंवार त्याला हुलकावणी देत राहतो. दोन घराण्यांतील हे पारंपरिक शत्रुत्व संपविण्याचा प्रयत्न जस्सी करीत राहतो.
बिल्लू संधूचे खानदान म्हणजे एकदम व्यंगचित्रात्मक व्यक्तिरेखांची फलटण आहे. त्यांच्या वागण्याबोलण्यातून विनोदनिर्मिती करण्याचा लटका प्रयत्न दिग्दर्शक करू पाहतो. परंतु, निखळ विनोदाऐवजी सारेच हास्यास्पद ठरते. सगळ्या व्यक्तिरेखांचे अतिरंजित वागणे असले तरी सुखमित आणि पमी अर्थात सोनाक्षी आणि जुही चावला यांच्या वावरामुळे चित्रपट किंचितसा सुसह्य़ ठरतो. चक्रम पात्रांतून सरदारजीपणा दाखविण्याचा प्रयत्नही हास्यास्पद ठरतो.  अजय देवगणने यापूर्वी साकारलेल्या ‘सिंघम’मधील भूमिका असो की ‘गंगाजल’मधील भूमिक असोत किंवा ‘दिल तो बच्चा है’मधली भूमिका असो त्याच्या सगळ्या अभिनय कारकीर्दीवर त्यानेच निर्मिलेला हा चित्रपट पाणी फिरवितो. यातील अजय देवगणचा अभिनय खूप भडक नाही. परंतु, संजय दत्त, विंदू दारासिंग, मुकुल देव, तनुजा यांच्या भडक, अतिरंजितपणापुढे अजय देवगण प्रभावी वाटत नाही. वरचेवर हास्यास्पद प्रसंगांची भरपूर रेलचेल आहे. तनुजासारख्या अभिनेत्रीने बेबे ही व्यक्तिरेखा कशी काय स्वीकारली असा प्रश्न पडतो. मात्र जुही चावलाने आपल्या छोटय़ा भूमिकेतही आपले अस्तित्व दाखवून दिले आहे.
सरदारजी विनोदाचा चांगला वापर न करता दिग्दर्शकाने मॅड कॉमेडीच्या नावाखाली तथाकथित मनोरंजन दाखवून चित्रपट हास्यास्पद करून टाकला आहे.
सन ऑफ सरदार
निर्माते – अजय देवगण, एन. आर. पचिसिया,
प्रवीण तलरेजा
दिग्दर्शक -अश्विनी धीर
पटकथा – रॉबिन भट, अश्विनी धीर
छायालेखन – असीम बजाज
संगीत – हिमेश रेशमिया
गीते – समीर अंजान
कलावंत – अजय देवगण, सोनाक्षी सिन्हा, संजय दत्त, जुही चावला, मुकुल देव, विंदू दारासिंग, अर्जन बावेजा, तनुजा, पुनित इसार, सलमान खान, राजेश विवेक व अन्य.