संरक्षण दलात चालक म्हणून कार्यरत असणारे दिनेश प्रकाश पवार हे तांबवे (ता. कराड) येथील जवान संशयास्पद रीत्या बेपत्ता झाले आहेत. दरम्यान, १५ जानेवारी २०१३ पासून दिनेश बेपत्ता असूनही संरक्षण विभाग त्याबाबत गांभीर्याने दखल घेत नसल्याने आपले कुटुंब पुरते हवालदिल असल्याची शोकांतिका दिनेश यांच्या पत्नी जयश्री पवार यांनी मांडली. दिवंगत लोकनेते व भूतपूर्व संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण व विद्यमान मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कर्मभूमीतीलच एका जवानाच्या कुटुंबाची ही असह्य परवड असून, सेवेतील बेपत्ता जवानाबाबत संभ्रमावस्था व्यक्त करणाऱ्या एकंदर प्रकारामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त के ले जात आहे.
तांबवे येथील दिनेश पवार हे २००४ साली संरक्षण विभागात चालक म्हणून रुजू झाले. ते बंगळूरमध्ये कार्यरत होते. गत नऊ वर्षांत त्यांनी देशाच्या विविध भागात सेवा बजावली आहे. सहा महिन्यांपूर्वी त्यांची सिकंदराबाद-हैदराबाद येथील युनिटमध्ये बदली झाली. दि. १५ जानेवारी २०१३ रोजी दुपारी दिनेश व त्यांची पत्नी जयश्री यांचे फोनवरून बोलणे झाले. त्याच दिवशी रात्री पुन्हा जयश्री यांनी दिनेश यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपर्क झाला नाही. त्यानंतर काही दिवस जयश्री यांनी प्रयत्न करूनही दिनेश यांच्याशी त्यांचा संपर्क झाला नाही. त्यामुळे त्या वडिलांना घेऊन सिकंदराबाद येथे गेल्या. त्या वेळी दिनेश हे १५ जानेवारीपासून बेपत्ता असल्याचे तेथील अधिकऱ्यांनी जयश्री यांना सांगितले. जयश्री यांनी त्वरित स्थानिक पोलीस ठाण्यात जाऊन याबाबतची फिर्याद दिली. मात्र, गत सहा महिन्यांपासून दिनेश यांचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही.
पोलीस किंवा संरक्षण विभागाने माझ्या पतीचा शोध घेण्याचाही प्रयत्नही केलेला नाही. ही आमच्यासाठी चिंतेची बाब आहे. संरक्षण विभागाकडून तर आम्हाला बेजबाबदारपणाची उत्तरे दिली जात आहेत. बेपत्ता दिनेश यांचा शोध घेण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न व्हावेत अशी मागणी जयश्री पवार यांनी केली आहे.