ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात बफर झोनअंतर्गत येणाऱ्या गावांतील प्रत्येक घरात गॅस व निर्धूर चूल वाटपाचा कार्यक्रम जागतिक वन्यजीव सप्ताहानिमित्त वन विभागाने हाती घेतला आहे. कोळसा व जळाऊ लाकडांच्या धुरापासून ताडोबा बफर झोन कायम मुक्त करण्यासाठी तसेच वन्यजीवांना शुद्ध हवा मिळावी म्हणून साधारणत: वर्षभर हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
पट्टेदार वाघ व बिबटय़ांमुळे प्रसिद्धीस आलेल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बफर झोनमध्ये ८९ गावांचा समावेश आहे. कोअर झोनमध्ये सहा गावे असून त्यातील काही गावांचे पुनर्वसन झाले आहे. मात्र बफर झोनमधील गावांची संख्या अधिक असल्याने वन खात्याने या सर्व गावांमध्ये लक्ष केंद्रित केले आहे. ताडोबा बफर झोनमध्ये चंद्रपूर, भद्रावती, सिंदेवाही, मूल व चिमूर या पाच तालुक्यांतील गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये हजारो कुटुंबे वास्तव्याला आहेत. ही शेतकरी कुटुंबे असल्याने व उत्पन्नाचे कुठलेही ठोस साधन नसल्याने बहुतांश कुटुंबांची आर्थिक परिस्थिती जेमतेम आहे.
बहुतांश घरात स्वयंपाकाचा गॅससुद्धा नाही. प्रत्येक घरात स्वयंपाकासाठी कोळसा व जळाऊ लाकडांच्या चुलीचा वापर केला जातो. त्यामुळे सकाळ व संध्याकाळी जंगलात चुलीतून निघणाऱ्या धुराचे साम्राज्य बघायला मिळते.
चुलीतून निघणाऱ्या या धुराचा परिणाम वन्यजीवांसह झाडे, पक्षी, फुलपाखरे व जंगलातील इतर जीव यांच्यावर होतो. ही सर्व परिस्थिती लक्षात घेता आता वन खात्याने या गावांतील प्रत्येक घरात व कुटुंबात गॅस व निर्धूर चूल वाटपाचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे.
गॅसचे वितरण करताना ७५ टक्के रक्कम ही शासन देणार आहे तर २५ टक्के रक्कम स्वत: गावकऱ्याला भरावी लागणार आहे. यात कनेक्शनसह १२ सिलिंडरचे पैसे देण्यात येणार आहेत. निर्धूर चूल कार्यक्रम प्रत्येक कुटुंबात घेण्यात येणार असल्याची माहिती बफर झोनचे उपवनसंरक्षक नरबळे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली. यात प्रत्येक कुटुंबाला निर्धूर चूल तयार करण्याचे प्रशिक्षण वन विभागाच्या तज्ज्ञ व्यक्तीकडून दिले जाणार आहे. प्रत्येक घरी तशी चूल तयार करून दिली जाणार आहे. साधारणत: वर्षभर हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. जागतिक वन्यजीव सप्ताहापासून या कार्यक्रमाला सुरुवात होणार असून ७ ऑक्टोबर २०१४ पर्यंत हा कार्यक्रम राबविला जाणार आहे.
हा कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी बफर झोन कार्यालयाच्या वतीने प्रत्येक गावात निर्धूर चूल तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत दिली जाणार नसली तरी साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. सध्या वन खाते या सर्व गावांतील व्यक्तींची नावे नोंदवून घेत असून प्रत्येक घरी निर्धूर चूल राहील, याची काळजी वन खात्याच्या वतीने घेतली जात आहे.