यवतमाळ विधानसभा पोटनिवडणुकीची तारीख लवकरच निवडणूक आयोगाकडून जाहीर होणार असल्याच्या चच्रेमुळे सर्वच राजकीय पक्षांची निवडणूक लढवण्याच्या संदर्भात जोरदार तयारी झाली असून भाजपतर्फे माजी आमदार मदन येरावार यांच्या उमेदवारीची सर्वाधिक चर्चा आहे. माजी मंत्री व माजी खासदार भाजप नेते राजाभाऊ ठाकरे यांनी भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्याशी अलीकडेच चर्चा करून या पोटनिवडणुकीसाठी मदन येरावार यांच्या नावाची शिफारस केली आहे.
राजाभाऊ ठाकरे भाजपच्या उमेदवारीवर आमदार, खासदार आणि मंत्री राहिलेले आहेत, मात्र त्यांनी काही काळानंतर भाजपला रामराम करून केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता, पण तेथे ते फार काळ रमले नाहीत. त्यांनी नितीन गडकरी यांच्या नागपुरातील वाडय़ावर ‘स्वगृही’ परत येऊन भाजपसाठी पुन्हा पक्षबांधणी सुरू केली, परंतु पक्षाचे संघटन विस्कटलेले आहे. पक्ष संघटना मजबूत नाही त्यामुळे निवडणूक कशी लढणार आणि कुणाच्या भरवशावर लढणार, असा जाहीर सवालही उपस्थित करून पक्षात चांगलीच खळबळ निर्माण केली आहे. याच पाश्र्वभूमीवर या पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवारीबद्दलची चर्चा सुरू असताना त्यांनी मदन येरावार यांना उमेदवारी देण्याबाबत पक्षश्रेष्ठींकडे शिफारस केली आहे. उल्लेखनीय म्हणजे, भाजपमध्ये गटबाजी शिगेला पोहोचलेली असल्याने भाजपच्या जिल्हाध्यक्षपदाचा वाद कितीतरी दिवस गाजत राहिला. अखेर राजेंद्र डांगे यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली, मात्र अजूनही पक्षांतर्गत गटबाजी मिटलेली नाही. ही बाब लक्षात घेऊन आधी पक्षसंघटन मजबूत करण्यावर राजाभाऊ ठाकरे यांनी जोर दिला आहे. भाजपमध्ये माजी आमदार संदीप धुर्वेही आता ४ वर्षांच्या विश्रांतीनंतर सक्रीय झाले आहेत. त्यांना २०१४ मधील आर्णी विधानसभा मतदार संघात निवडणूक लढण्यात रस दिसत आहे.     
काँग्रेस आमदार नीलेश पारवेकर यांचे २७ जानेवारीला अपघाती निधन झाले. त्यामुळे रिक्त झालेल्या जागी लवकरच पोटनिवडणूक होऊ घातली आहे. काँग्रेसतर्फे या निवडणुकीत नीलेश पारवेकर यांच्या पत्नी नलिनी यांना जर उमेदवारी दिली तर राष्ट्रवादी उमेदवार उभा करणार नाही, अशी भूमिका राष्ट्रवादीची असल्याचे राकाँ नेते आमदार संदीप बाजोरीया यांनी म्हटले आहे. नलिनी पारवेकरांशिवाय इतर कोणाला काँग्रेसने उमेदवारी दिल्यास राष्ट्रवादी वेगळा विचार करील, अशी राष्ट्रवादीत चर्चा आहे. राष्ट्रवादी ही निवडणूक लढणार की नाही, याबाबत कोणीही कोणतीही प्रतिक्रिया दिलेले नाही. रिपाई (गवई) ची भूमिका या निवडणुकीत राष्ट्रवादीसोबत असावे, अशी असल्याचे संकेत आमदार राजेंद्र गवई यांनी दिले आहेत. काँग्रेसची उमेदवारी आपल्याला मिळावी, यासाठी नीलेश पारवेकर यांचे बंधू योगेश पारवेकर यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू केली असतानाच व राहुल गांधी यांची भेट घेतली असताना दुर्दैेवाने पारवेकर कुटुंबावर नियतीचा आणखी एक आघात झाला. योगेश पारवेकर यांच्या पत्नी श्वेता यांचे निधन झाले. दरम्यान, राष्ट्रवादीमधून माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याने अण्णासाहेब पारवेकरांना काँगेसमध्ये घेऊन त्यांना यवतमाळची उमेदवारी द्यावी, असा प्रयत्न पारवेकर कुटूंबातीलच जवळच्या नातलगांनी सुरू केल्याचे वृत्त आहे. अर्थात, काँग्रेस अण्णासाहेब पारवेकरांना पक्षात घेणार की नाही, याबाबत उलटसुलट चच्रेला ऊत आलेला आहे. यवतमाळ मतदारसंघातील काँग्रेसचे माजी आमदार कीर्ती गांधी हेही उत्सुक आहेत. शिवाय, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चौधरी आणि जि.प.चे माजी अध्यक्ष राहुल माणिकराव ठाकरे यांचीही नावे चच्रेत आहेत.  शिवसेना आणि भाजप यांची युती असल्यामुळे आणि यवतमाळ मतदार संघावर भाजपचा दावा असल्यामुळे भाजपसोबत जाणे एवढीच शिवसेनेची भूमिका आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, सेना आणि भाजप या चार पक्षांशिवाय इतर पक्षांची स्थिती जिल्ह्य़ात तोळामासा असल्याने ते फारसे चच्रेत नाहीत. या निवडणुकीत राष्ट्रवादीची भूमिका मात्र निर्णायक राहणार आहे कारण, २०१४ ची निवडणूक मात्र स्वबळावर लढवावी, असाच राष्ट्रवादीच्या बऱ्याच नेत्यांचा व कार्यकर्त्यांचा विचार आहे.
पोटनिवडणूक महत्त्वाची  
यवतमाळ विधानसभा पोटनिवडणूक लढणाऱ्या उमेदवाराला फार तर सव्वा वर्षांचाच आमदारकीचा कालावधी मिळणार आहे. कारण, २०१४ मध्ये पुन्हा निवडणूक होणारच आहे. असे असले तरी २०१४ मध्ये आपला उमेदवारीचा दावा सांगता यावा, यासाठी सर्वच पक्षातील उमेदवार ही निवडणूक लढण्यास तयार आहेत. कारण, निवडून आले तर हमखास दावा सांगता येतो आणि पराभूत झाले तरीही दावा सांगता येतो, असे राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटत आहेत.