विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाण्यात पुन्हा एकदा फोडाफोडीचे राजकारण रंगले असून ओवळा-माजिवडा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी भास्कर शेट्टी यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत काँग्रेसला धक्का दिला. या मतदारसंघात एकगठ्ठा मतांचे मानकरी समजले जाणारे रिपब्लिकन पक्षाचे नेते नानासाहेब इंदिसे यांनी राष्ट्रवादीला पािठबा देत असल्याचे जाहीर केले.
निवडणुकीच्या हंगामात येथे मोठय़ा प्रमाणावर फाटाफुटीचे राजकारण पाहायला मिळते. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मात्र हे प्रमाण कमी होते. मात्र प्रचाराची सुरुवात होताच एकमेकांचे पदाधिकारी फोडण्याचे उद्योग पुन्हा एकदा सुरू झाले असून गुरुवारी आर.आर.पाटील यांच्या उपस्थितीत ओवळा-माजिवडा मतदारसंघातील काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे पाहावयास मिळाले.
वर्तकनगर परिसरातील काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक म्हणून परिचित असणारे भास्कर शेट्टी यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करताना काँग्रेस नेतृत्वावर टीकेचे प्रहार ओढले. या मतदारसंघातून काँग्रेसने भाईंदर परिसरातील नगरसेविका प्रभात पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे.  सुमारे पावणेचार लाख लोकसंख्या असलेल्या या मतदारसंघातील सुमारे १ लाख ६५ हजार मतदार भाईंदर भागातील आहेत. त्यामुळे ठाण्यातील उमेदवार देण्याऐवजी काँग्रेसने येथून भाईंदर पट्टय़ातील नगरसेविकेला उमेदवारी दिली आहे. त्यामुळे वर्तकनगर, लोकमान्यनगर, शिवाईनगर, घोडबंदर परिसरातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता असून भास्कर शेट्टी यांच्या रूपाने गुरुवारी ती दिसून आली. वर्तकनगर परिसरातील दोन प्रभागांवर वरचष्मा राखणाऱ्या इंदिसे कुटुंबाने यावेळी राष्ट्रवादीला पािठबा जाहीर केला. दलित मतदारांचा भरणा असलेल्या शास्त्रीनगर परिसरात इंदिसे यांचा वरचष्मा दिसून येतो.