चॅनल बी ११ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध स्पर्धा आयोजित केल्या आहेत. या स्पर्धेचा आणि भीमा फेस्टिव्हलचा प्रारंभ आजपासून खुल्या प्रत्यक्ष निसर्ग चित्रण स्पर्धेने झाला. या स्पर्धेला चित्रकारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. निसर्गाच्या विविध छटांना आपल्या कुंचल्यातून कागदावर उतरवत, कलाकारांनी आपल्या कलाविष्काराचे दर्शन घडविले. प्रथम क्रमांकाचे बक्षीस सुरज शेलार याने तर तुषार पोटे व गणेश पोतदार यांनी अनुक्रमे व्दितीय व तृतीय क्रमांकाचे बक्षीस पटकाविले.
जनमानसामध्ये अढळ स्थान निर्माण केलेल्या चॅनल बी च्या वर्धापनदिनानिमित्त दरवर्षी भीमा फेस्टिव्हलचे आयोजन केले जाते. भीमा फेस्टिव्हलचा प्रारंभ आज सकाळी निसर्गचित्रण स्पर्धेने झाला. टाऊन हॉल, पंचगंगा घाट या निसर्गरम्य ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन चित्रकारांनी निसर्गाचे चित्रण केले. निसर्गाच्या नानाविध छटा चित्रकारांनी आपल्या कुंचल्यातून कागदावर अलगद उतरविल्या. कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी चॅनल बीच्या अध्यक्षा अरूंधती धनंजय महाडिक, विश्वराज महाडिक, चित्रकार विजय टिपुगडे, अनंत यादव यांनी प्रत्यक्ष भेटी दिल्या.
या स्पर्धेतील चित्रकारांनी जलरंग, तैलरंग, ऑक्रेलिक, पेस्टल या माध्यमांचा वापर करून हुबेहूब स्थलचित्रण करीत आपला कलाविष्कार कॅनव्हास पेपरवर साकारला. या स्पर्धेत एकूण ८० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये मुलींचा सहभाग मोठय़ा प्रमाणात होता.
युवा नेते धनंजय महाडिक यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना रोख पारितोषिक, स्मृतिचिन्ह तसेच प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी चित्रकार अनिल अभंगे, प्रतिभा वाघ, चित्रगंधा सुतार, इंद्रजित जाधव, यशोराज पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेचे परीक्षण प्राचार्य अजय दळवी व चित्रकार नागेश हंकारे यांनी केले.