उरणमध्ये मैदानासाठी खेळाडूंची वणवण

खेळ म्हणजे भविष्याची तरतूद असते, असे म्हटले जाते त्यामुळे खेळाला प्राधान्य दिले जाते असे असले, तरी उरण तालुक्यात मात्र या बाबतीत उलटेच घडत असल्याचे चित्र असून उरणमधील अनेक धावपटू राष्ट्रीय व

खेळ म्हणजे भविष्याची तरतूद असते, असे म्हटले जाते त्यामुळे खेळाला प्राधान्य दिले जाते असे असले, तरी उरण तालुक्यात मात्र या बाबतीत उलटेच घडत असल्याचे चित्र असून उरणमधील अनेक धावपटू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उरण आणि रायगडचे नाव उंचावत असताना खेळाडू मागील अनेक वर्षांपासून मैदानाची मागणी करूनही मैदान उभारले जात नाही. उरण तालुक्यातील मैदानासाठी जिल्हा क्रीडा विभागाने सिडकोकडे जमिनीची मागणी केली आहे, मात्र त्याचा प्रस्ताव मागील चार महिन्यांपासून शासनाकडे पडून आहे. त्यामुळे उरणमधील विविध विभागांतील खेळाडूंवर ‘कोणी मैदान देता का मैदान ?’ म्हणून आर्त हाक देण्याची वेळ आली आहे.
विकास आणि उरण हे समीकरण बनू पाहत आहे. उरण तालुका रायगड जिल्ह्य़ातील, महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील औद्योगिकदृष्टय़ा विकसित होणारा तालुका आहे. राज्य सरकारच्या क्रीडा धोरणानुसार जिल्ह्य़ातील प्रत्येक तालुक्यात मैदानासाठी शासनाने एक कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे, मात्र उरण तालुक्यात शासनाची जागा नसल्याने मागील तीन वर्षांपासून हा प्रस्ताव पडून आहे. या संदर्भात सिडकोकडे क्रीडा विभागाने जमिनीची मागणी केली असता, सिडकोने अडीच एकर जमिनीसाठी ८६ लाख रुपये जमा करण्याची सूचना केली होती. क्रीडांगणासाठी शासनाकडून मंजूर झालेल्या १ कोटी रुपयांतून ८६ लाख जागेला दिल्यास मैदान कसे होणार, त्यामुळे सिडकोने मैदानाची जागा विनामूल्य द्यावी, अशी मागणी केल्याची माहिती रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी सुनीता रिकामे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली आहे. त्यानंतर ९ ऑक्टोबर २०१४ ला सिडकोने शासनाकडे जमिनीचा प्रस्ताव पाठविला असला, तरी चार महिन्यांनतरही त्याला मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे क्रीडा विभागाने पर्याय म्हणून उरण नगरपालिकेच्या वीर सावरकर मैदानात धावपट्टी तयार करण्याचा प्रस्ताव पाठविला असून त्याकरिता मंजूर एक कोटी रकमेपैकी ७० लाखांची मागणी केली आहे. या मागणीलाही वर्ष होत आला आहे. मात्र मंजुरी मिळाल्यास २०१५मध्ये उरणमध्ये धावपट्टी तसेच इतर खेळांसाठी मैदान तयार होईल, असा विश्वास जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

समस्यांना तोंड देत सराव
उरण तालुक्यातील खेळाडूंना खेळाचे मैदान नसल्याने खेळाडूंना अनेक समस्यांना तोंड देत सराव करावा लागत आहे. मागील वर्षी उरणमधील धावपटू नीलम कदम ही उरण पनवेल रस्त्यावर धावण्याचा सराव करीत असताना पहाटे तिला एका टेम्पोने धडक दिल्याची घटना घडली होती. तर नुकत्याच पार पडलेल्या मुंबई मॅरेथॉनमध्ये तिसऱ्या आलेल्या सुप्रिया पाटील हिच्या पायाला सरावादरम्यान काटा रुतल्याने जखम झाली होती. या मॅरेथॉनमध्ये तिला या जखमेसह सहभागी व्हावे लागले होते. पहाटे सराव करताना असलेला अंधारही अपघाताना कारण ठरू पाहत आहे.

तरीही खेळाडुंची कामगिरी
मुंबईच्या मॅरेथॉननंतर उरणच्या सुप्रिया पाटीलने जयपूर मॅरेथॉनमध्ये २१ किलोमीटरच्या स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले आहे. तर बोकडविरा येथील प्रशांत पाटील याने विदेशात जाऊन आपला झेंडा फडविला आहे. येथील वीर वाजेकर महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी देशभरातील महाविद्यालयीन स्पर्धात आपला ठसा उमटवीत आहेत. असे असताना मागील अनेक वर्षांपासून मागणी करूनही उरणमधील धावपटू तसेच इतर खेळाडूंना मैदान मिळालेले नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Sports person looking for ground in navi mumbai