राज्य व्यावसायिक नाटय़स्पर्धेत ‘लोच्या झाला रे’!

राज्य सांस्कृतिक संचालनालयातर्फे घेण्यात आलेली व्यावसायिक नाटय़ स्पर्धा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

राज्य सांस्कृतिक संचालनालयातर्फे घेण्यात आलेली व्यावसायिक नाटय़ स्पर्धा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. नियमानुसार स्पर्धेसाठी केवळ नवी संहिताच (नाटक) सादर करणे आवश्यक होते. मात्र व्यावसायिक नाटय़ निर्माता संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या विनंतीवरून ही अट बदलण्यात आली आणि पुनरुज्जीवित नाटकांनाही स्पर्धेत सहभागी होण्यासाठी परवानगी देण्यात आली. मात्र हा बदल सर्व नाटय़ निर्मात्यांपर्यंत पोहोचला नाही आणि त्यामुळे स्पर्धेत काही ठरावीकच पुनरुज्जीवीत नाटके सादर झाली, असा काही नाटय़ निर्मात्यांचा आक्षेप आहे.
व्यावसायिक नाटय़ निर्माता संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांस्कृतिक कार्यमंत्र्यांना या अटीत यंदा बदल करावा आणि जुन्या संहिताही सादर करण्यास परवानगी असावी, असे पत्र दिले. त्याची दखल घेऊन सांस्कृितक कार्य संचालनालयाने बदल केला. हे पत्र दिल्यानंतर नाटय़ निर्माता संघाच्या सर्व सदस्यांची तातडीने बैठक बोलावून त्यांना या बदलाची माहिती द्यायला हवी होती, मात्र तसे झाले नाही.  

एकदा स्पर्धा आहे म्हटल्यानंतर त्याचे जे नियम केलेले आहेत, ते सगळ्यांनी मान्य करणे आवश्यक आहे. पुनरुज्जीवित नाटकेही स्पर्धेत सहभागी होऊ शकतील, असा बदल केला गेला तर तो सर्व नाटय़ निर्मात्यांपर्यंत पोहोचेल याची खबरदारी घेणे गरजेचे होते. काही ठरावीक जणांपर्यंतच हा निरोप गेल्याने अन्य काही निर्माते त्यांची पुनरुज्जीवीत नाटके स्पर्धेत दाखल करू शकले नाहीत.
मंगेश कदम, लेखक-दिग्दर्शक

स्पर्धेच्या प्रवेश अर्जात आणि नियम-अटींमध्ये नवीन संहिता पाहिजे, असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते. झालेल्या बदलाची माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचली नाही. या प्रकरणी आम्ही काही निर्माते एकत्र येऊन सांस्कृतिक कार्य संचालनालयाला आणि व्यावसायिक नाटय़ निर्माता संघाला पत्र देणार आहोत. निर्मात्यांवर झालेला हा अन्याय कसा दूर करता येईल, त्यावर आता विचार व्हावा.  
अनंत पणशीकर, नाटय़ निर्माते

हे झाले तेव्हा मी मुंबईत नव्ह्तो. मात्र नियमात जो बदल केला गेला त्याबाबतची माहिती नाटय़ निर्माता संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व निर्मात्यांना कळविली होती. राज्य नाटय़ व्यावसायिक स्पर्धेत केवळ नवीनच नाटके सादर झाली पाहिजेत. पुनरुज्जीवीत नाटकांसाठी हवी तर वेगळी स्पर्धा घ्यावी.
 प्रशांत दामले, अध्यक्ष, व्यावसायिक नाटय़ निर्माता संघ

ही स्पर्धा व्यावसायिक नाटय़ निर्माता संघाच्या सहकार्यानेच आपण घेतो. त्यांच्याच विनंतीनुसार नियमात बदल केला. तसेच हा बदल सर्व निर्मात्यांपर्यंत पोहोचवा, असे त्यांना सांगितले. त्यानंतर त्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून तशी खातरजमाही करून घेतली होती. ज्यांना अन्याय झाला असे वाटत असेल त्यांनी व्यावसायिक नाटय़ निर्माता संघ, सांस्कृतिक कार्य संचालनालयाला तसे निवेदन द्यावे.
    अजय आंबेकर,  सांस्कृतिक कार्य संचालक

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: State professional drama competition in dispute

ताज्या बातम्या