गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षेत विदर्भाचा टक्का अल्पसा का होईना वृद्धिंगत होत असल्याचे चित्र यंदा पालटले आहे. २०१४च्या राज्यसेवा परीक्षेत विदर्भातील १३ उमेदवार यशस्वी झाले आहेत. मागील वर्षी १७ उमेदवारांनी यश मिळविले होते.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या २०१४च्या राज्यसेवा परीक्षेचा निकाल रविवारी जाहीर करण्यात आला. उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक, तहसीलदार अशा महत्त्वाच्या पदाकरिता ही परीक्षा झाली होती. ‘अ’ वर्गातील १२५ आणि ‘ब’ वर्गातील ३१३ पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. यात नागपूर आणि अमरावती विभागातून केवळ १३ उमेदवारांची निवड झाली आहे. राज्यात ४३८ उमेदवारांची निवड झाली आहे.
बुलढाणा येथील सिद्धार्थ भंडारे हा राज्यसेवा परीक्षेत राज्यात अनुसूचित जातीमधून दुसरा आला आहे. भंडारे यांनी पुण्याहून परीक्षा दिली होती. यामुळे विदर्भाच्या यशाच्या टक्क्यात त्याचा समावेश होत नाही.

‘अ’ वर्गातील पदाकरिता विदर्भातील तीन उमेदवारांची निवड झाली आहे.
यात विशालकुमार मेश्राम, महादेव खेडकर, स्वप्नील तांगडे (अमरावती) यांची उपजिल्हाधिकारी पदासाठी निवड झाली आहे.
‘ब’ वर्गातील पदासाठी दहा उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. यात अश्विनी केदार (पोलीस उपअधीक्षक), किशोर गज्जलवार (सहायक खंड विकास अधिकारी), बुलाढाणा जिल्ह्य़ातील लोणार तालुक्यातील ज्ञानेश्वर टक्रस (सहायक खंड विकास अधिकारी), प्रसेनजीत कार्लेकर (सहायक खंड विकास अधिकारी), अर्चना माळवे (नायब तहसीलदार), सुरज बारापात्रे (नायब तहसीलदार), नीलेश डाके (नायब तहसीलदार), विजय सुरडकर (नायब तहसीलदार), सर्वेश मेश्राम (नायब तहसीलदार), सागर कुळकर्णी (नायब तहसीलदार) या यशवंतांनी विदर्भाच्या गुणवत्तेची किर्ती महाराष्ट्रभर पोहोचवली आहे.
अमरावतीच्या युनिक अकादमीचे यवतमाळ जिल्ह्य़ातील आर्णी येथील परमानंद गावंडे आणि यवतमाळची शिल्पा नगराळे यांची नायब तहसीलदार पदासाठी निवड झाली आहे. परंतु गावंडे याने औरंगाबाद तर नगराळे याने पुण्याहून परीक्षा दिली. यामुळे त्यांची विदर्भाच्या यशाच्या टक्केवारीत गणती होत नाही.
‘अ’ वर्गातील पदासाठी निवड झाल्याबद्दल आनंद आहे. राज्यसेवा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की, ध्येय निश्चित करून ते साकारण्यासाठी वाटचाल केल्यास यशाला गवसणी घालणे सोपे जाते.
– स्वप्निल तांगडे, उपजिल्हाधिकारी.
छायाचित्र – सुरज बारापात्रे
परीक्षेचा पॅटर्न बदलेला आहे. त्यानुसार उमेदवारांना देखील अभ्यासाची पद्धत बदलावी लागणार आहे. पुण्याशी तुलना केल्यास ग्रामीण भागातील अधिक मुले उत्तीर्ण झाली आहे. त्यात २० टक्के मुले विदर्भातील आहे. विदर्भातील मुले पुण्याहून परीक्षेला बसल्याने पुण्याचा निकाल वाढला आहे. विदर्भातील मुलांना बराच वाव आहे. येथील मुले अधिक परिश्रम घेत आहेत. प्रयत्न आणि सातत्य यामुळे यश हमखास येते.
– सुरज बारापात्रे, नायब तहसीलदार
२०१४ च्या राज्यसेवा परीक्षेच्या लेखी परीक्षा मोठय़ा संस्थेने विदर्भातील उमेदवार उत्तीर्ण झाले होते. परंतु मुलाखतीच्या फेरीत बाद होण्याचे प्रमाण वाढले आहे, असे स्पर्धा परीक्षा तयारी करवून घेणाऱ्या काही संस्था संचालकांचे म्हणणे आहे.