महसूल गोळा करणाऱ्या खात्यांवर राज्याचा विकास अवलंबून आहे. राज्यात सीमावर्ती भागात परिवहन, विक्रीकर व राज्य उत्पादन शुल्क या तीन प्रमुख विभागांच्या संयुक्त विद्यमाने २२ ठिकाणी अद्ययावत स्वरूपाची सीमा तपासणी नाके उभारण्यात येत असून त्यामुळे राज्याच्या महसुलात वाढ होऊन पर्यायाने राज्याचा विकासदर वाढणार असल्याबद्दलचा विश्वास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.
सोलापूर-विजापूर महामार्गावर महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर नांदणी (ता. दक्षिण सोलापूर) येथे परिवहन विभाग व राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत बीओटी तत्त्वावर उभारण्यात आलेल्या अद्ययावत सीमा तपासणी नाक्याचा उद्घाटन सोहळा मुख्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते शनिवारी सकाळी संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यास सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) खात्याचे मंत्री जयदत्त क्षीरसागर, सोलापूरचे पालकमंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे, दुग्धविकासमंत्री मधुकरराव चव्हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, महसूल गोळा करणाऱ्या खात्यांनी अपेक्षेनुसार महसूल गोळा केला नाही तर राज्याला दोन लाख कोटींचा खर्च करावा लागतो. यंदाच्या दुष्काळी पाश्र्वभूमीवर नियोजन आयोगाने ४९ हजार कोटींचे अंदाजपत्रक मंजूर केले आहे, तर राज्याचे स्वत:चे ३१ हजार कोटी असे मिळून ८० हजार कोटींची तरतूद राज्याच्या विकासावर खर्च होणार आहेत. महसुलात घट न होता त्यात वाढ होण्यासाठी कारभारात पारदर्शकता येणे आवश्यक आहे. सीमा तपासणी नाक्यांमध्ये अद्ययावत, मानांकित व सक्षम यंत्रणा राहणार असून त्यामुळे महसुलात वाढ होण्यास मदत होणार आहे. क्षमतेपेक्षा जादा मालवाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे जादा मालाच्या वजनापेक्षा रस्ते आठ पटींनी खराब होतात. म्हणून जादा वजनाचा माल वाहून नेऊ नये, क्षमतेनुसारच मालवाहतूक व्हावी म्हणून सीमा तपासणी नाके सहाय्यभूत ठरणार आहेत. अत्याधुनिक सीमा तपासणी नाक्यांमुळे आंतरराज्य मालवाहतूक सुरळीत होऊन अवैध मालवाहतुकीवर आळा बसेल. या सीमा तपासणी नाक्यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य देशात पहिल्या क्रमांकाचे ठरेल, असाही विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला.
केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी, देशाची संपत्ती वाढविण्याचे काम करप्रणालीतून होते. ती आणखी बळकट होऊन पर्यायाने देश मजबूत  होण्याच्या दृष्टीने सीमा तपासणी नाक्यांचा महत्त्वाचा हातभार लागेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. या सीमा तपासणी नाक्यासाठी जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना तपासणी नाक्यावर व्यवसायासाठी दुकाने, पेट्रोलपंप मिळवून देण्याचा आग्रह शिंदे यांनी सोलापूरचा लोकप्रतिनिधी या नात्याने धरला. यावेळी जयदत्त क्षीरसागर यांचेही भाषण झाले. परिवहन विभागाचे प्रधान सचिव डॉ. शैलेशकुमार शर्मा यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. या समारंभाचे औचित्य साधून नान्नजच्या शरद शेतकरी सहकारी सूतगिरणीच्या वतीने गिरणीचे अध्यक्ष, माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांनी दुष्काळ निवारणासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरिता एक लाखाचा धनादेश मुख्यमंत्री चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केला. सूत्रसंचालन मंजिरी मराठे यांनी केले तर राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी यांनी आभार मानले.
मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविले
दरम्यान, नांदणी येथे सीमा तपासणी नाक्याच्या उद्घाटन सोहळ्यात भाषणासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे उभे राहताच उजनी धरणाच्या पाणी प्रश्नावर मुंबईत गेले शंभर दिवस आंदोलन करूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ सोलापूर जिल्हा जनहित शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अचानकपणे उभे राहून काळे झेंड दाखविले. ‘पृथ्वीराजबाबा पाणी द्या’, अशा घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना आंदोलकांकडे स्तब्धपणे पाहात उभे राहावे लागले. परंतु त्यांनी आपल्या भाषणात आंदोलनाची अजिबात दखल घेतली नाही.