मुंबई पोलीस दलातील चार वरिष्ठ निरीक्षकांच्या तीन वर्षांपूर्वी केलेल्या ‘तात्पुरत्या’ बदल्या महाराष्ट्र न्यायाधिकरणाने रद्द ठरविल्यामुळे अशा पद्धतीने केल्या गेलेल्या सुमारे दीडशे पोलिसांच्या बदल्या स्थगित होऊ शकतात, असे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र अशा पद्धतीने बदली झालेल्या संबंधित पोलिसाला ‘मॅट’कडे दाद मागावी लागणार  आहे.
बदल्यांविषयक नव्या कायद्यानुसार तीन वर्षे पूर्ण न झालेल्या निरीक्षकाची बदली करण्याचे अधिकार आयुक्तांना नाहीत. अशी बदली करावयाची असल्यास आयुक्तांना तसा प्रस्ताव गृहमंत्र्यांकडे मंजुरीसाठी पाठविणे आवश्यक आहे. तरीही काही वरिष्ठ निरीक्षक तसेच निरीक्षकांच्या बदल्या तीन वर्षांपूर्वीच करताना ‘तात्पुरती बदली’, असे नमूद करण्यात आले.
या शब्दाला आक्षेप घेत ‘मॅट’ने वरिष्ठ निरीक्षकांच्या बदल्या रद्द केल्या. त्यामुळे आयुक्तांवर नामुष्कीची पाळी आली. आयुक्तांना या बदल्या रद्द करून नव्याने आदेश काढावे लागले. मात्र या आदेशांमुळे अशा पद्धतीने बदल्या झालेल्या काही अधिकाऱ्यांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. त्यापैकी काहींनी मॅटचे दार ठोठावण्याचे ठरविले आहे तर काहींनी विनाकारण वरिष्ठांशी वाद नको, म्हणून गप्प बसण्याचे ठरविले आहे. मात्र या जागी ज्यांच्या नियुक्त्या झाल्या आहेत, त्यांच्यावर मात्र टांगती तलवार आहे.