शिवाजीनगर आणि रेंजहिल्स कॉर्नर येथून चोरीला गेलेले पीएमपीचे बसथांबे शुक्रवारी दुपारी सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाटय़ावर असलेल्या एका कारखान्यात सापडले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी ही चोरी उघडकीस आणून दिली असून हे बसथांबे रंगरंगोटी करून कॅन्टोन्मेंट हद्दीत बसवण्याचे काम एका ठेकेदाराने घेतल्याचेही उघड झाले आहे.
शिवाजीनगर येथील दोन आणि रेंजहिल्स कॉर्नर येथील एक असे पीएमपीचे तीन बसथांबे गेल्या आठवडय़ात चोरीला गेले होते. हे बसथांबे नांदेड फाटय़ापासून आत असलेल्या दळवीवाडी येथील एका कारखान्यात असल्याची माहिती मनसेच्या कार्यकर्त्यांना समजली. त्यानुसार महापालिकेतील विरोधी पक्षनेता वसंत मोरे यांनी तातडीने स्थानिक नगरसेवक राजाभाऊ लायगुडे तसेच अनिल मते व अन्य कार्यकर्त्यांसमवेत तिकडे धाव घेतली. रितेश जाधव, विकास दांगट, कैलास दांगट, बाळासाहेब बेनकर, चंदन कड, विजय मते आदी कार्यकर्तेही यावेळी उपस्थित होते.
दळवीवाडी येथे असलेल्या एका कारखान्यात हे सर्व थांबे आढळले. त्यांच्या दुरुस्तीचे आणि रंगरंगोटीचे काम तेथे सुरू होते. ही माहिती मोरे यांनी पीएमपी प्रशासनाला दिल्यानंतर पीएमपीचे शशिकांत भोकरे व अन्य अधिकारी जागेवर पोहेचले. शिवाजीनगर येथील बसथांबे चोरीला गेल्याची तक्रार भोकरे यांनीच दिली होती. त्यांनी या बसथांब्यांची पाहणी केल्यानंतर ते शिवाजीनगर आणि रेंजहिल्स कॉर्नर येथील असल्याचे भोकरे यांनी ओळखले. हे थांबे ज्या ट्रेलरमधून आणण्यात आले होते, तो ट्रेलरही तेथेच उभा होता.
या प्रकाराबाबत वसंत मोरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, कारखान्याचे मालक यावेळी उपस्थित नव्हते. ते परगावी होते. त्यांच्याकडे चौकशी केली असता, हे बसथांबे विशाल पल्लोळ यांनी या कारखान्यात आणून दिल्याचे त्यांनी सांगितले. पल्लोळ यांच्या तीन जाहिरात कंपन्या असून त्यांनी पुणे कॅन्टोन्मेंटच्या हद्दीत बसथांबे बसविण्याचे काम घेतले आहे. मात्र, हे थांबे जागेवरून का हलवण्यात आले, ते कॅन्टोन्मेंट हद्दीत का बसवले जाणार होते आणि त्यांची दुरुस्ती व रंगरंगोटी का सुरू होती, ते समजले नाही. याच कारखान्यात महापालिका शाळांमधील बाकही आम्हाला आढळून आले. अभिरुची पोलिसांकडे ही माहिती दिल्यानंतर त्यांनी संबंधित थांबे व अन्य साहित्य ताब्यात घेण्याची कार्यवाही सायंकाळी सुरू केली.