गोष्ट डोंगराची..

पारसिकच्या डोंगररांगांपासून तुफान वेगात धावत येणारे पावसाच्या पाण्याचे लोट आणि दुसरीकडे अमर्याद अशा रेती उपशामुळे खाडीच्या पोटात पडणारा खड्डा यामुळे ठाण्याच्या पल्ल्याड बेकायदा

पारसिकच्या डोंगररांगांपासून तुफान वेगात धावत येणारे पावसाच्या पाण्याचे लोट आणि दुसरीकडे अमर्याद अशा रेती उपशामुळे खाडीच्या पोटात पडणारा खड्डा यामुळे ठाण्याच्या पल्ल्याड बेकायदा पायावर उभ्या राहिलेल्या मुंब्य्रात दूर कुठेतरी आंबेगाव तालुक्यात घडलेल्या दुर्घटनेचे सावट बुधवारी सायंकाळपासून अगदी ठसठशीतपणे जाणवू लागले आहे. मुसळधार पाऊस सुरू होताच पारसिकच्या डोंगररांगा हिरव्यागर्द बनू लागतात. मग एरवी भकास वाटणारे मुंब्रा या काळात अचानक निसर्गरम्य वाटू लागते. परंतु, याच डोंगराच्या पायथ्याशी.. टेकडय़ांच्या कुशीत.. हिरव्यागर्द वनराईतून डोके वर काढून उभ्या राहिलेल्या बेकायदा इमल्यांवर हा लोभसवाणा वाटणारा डोंगर उलटला तर? हा विचार मुंब्रावासीयांच्या मनाचा थरकाप उडवू लागला आहे. मुंब्य्रात राहणाऱ्या जुन्या-जाणत्यांना हा डोंगर अचानक ‘नकोसा’ वाटू लागला असताना बाह्य़वळण रस्त्याच्या वरच्या बाजूस डोंगर पोखरून वस्ती उभी करणाऱ्या माफियांनाही माळीनी गावच्या दुर्घटनेमुळे आपल्या बांधकामांवर टाच येईल आणि आपले नफ्याचे ‘गणित’ चुकेल, अशी भीती वाटू लागली आहे.
रमजान ईदच्या उत्सवी माहोलातही मुंब्य्राच्या नाक्यानाक्यावर माळीनी गावाच्या दुर्घटनेची चर्चा आहे आणि या चर्चेचा केंद्रबिंदू ठरलाय तो पश्चिमेकडील डोंगर. गेल्या काही वर्षांपासून अमर्याद रेती उपशामुळे मुंब्य्राची खाडी खंगत चालल्याच्या तक्रारी पर्यावरण तज्ज्ञांकडून सातत्याने पुढे येत आहेत. खाडीच्या पोटात पडणाऱ्या खड्डय़ामुळे भूगर्भातील हालचालींचा नकारात्मक परिणाम मुंब्य्रावर दिसू लागला असून आधीच बेकायदा उभ्या राहिलेल्या इमारतींच्या पायाला आणखी धोका निर्माण झाल्याचा सूरही गेल्या काही वर्षांपासून व्यक्त होत आहे.
मुंब्य्राच्या पश्चिमेकडे पारसिकच्या डोंगररांगा आहेत. या डोंगरांमधून पावसाचे पाणी सुसाट वेगाने खाडीच्या दिशेने झेपावते. मात्र, पावसाचे हे पाणी खाडीपर्यंत पोहोचविण्यासाठी नियोजनबद्ध अशा नाल्यांची निर्मिती अजून मुंब्रा, कौसा परिसरात झालेली नाही. त्यामुळे बेकायदा, धोकादायक इमल्यांचे मुंब्रा नावाचे बेट कधी कोसळेल याचा नेम नाही. काही वर्षांपूर्वी ठाण्याहून कल्याणच्या दिशेने जाणारी वाहतूक मुंब्य्रातून होत असे. त्यामुळे होणाऱ्या अवाढव्य वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी मुंब्य्राचा बाह्य़वळण रस्ता तयार करण्यात आला. डोंगर कापून तयार करण्यात आलेला हा रस्ताही अधूनमधून खचू लागतो.
मध्यंतरी या रस्त्यावरून खाली कलंडलेला एक भला मोठा टँकर खाली एका वस्तीवर कोसळला आणि काही जणांचा बळी गेला. टेकडीच्या अगदी डोक्यापर्यंत या भागात बेकायदा घरे उभी आहेत. बाह्य़वळण रस्त्यामुळे नवी बांधकामे करण्यास फारसा वाव राहिला नव्हता. त्यामुळे येथील माफियांनी आता मोर्चा वळविला आहे तो पारसिक डोंगराच्या अगदी वरच्या टोकाकडे. गेल्या काही महिन्यांपासून बाह्य़ वळण रस्त्याच्या वर असलेला डोंगर छाटण्याचे काम पद्धतशीरपणे सुरू झाले आहे. आता तेथेही झोपडय़ा उभ्या केल्या जात आहेत. टेकडीचा एखादा भाग खाली आला तर? हा विचार येथील जुन्या-जाणत्यांना अस्वस्थ करीत असताना वर डोंगरही बेकायदा बांधकामांसाठी पोखरला जातोय, याविषयी मुंब्य्रात अनेकांच्या मनात नाराजी आहे. बुधवारी रात्री काहीजण ती बोलूनही दाखवित होते. माळीनी गावच्या दुर्घटनेमुळे निसर्गाचे जळजळीत वास्तव समोर असताना डोंगर आणखी कापायचा म्हणजे अतीच झाले, असे येथील अनेकांचे मत आहे. वर डोंगरावर बेकायदा वस्ती उभी करणाऱ्या माफियांना मात्र वेगळीच चिंता आहे. या दुर्घटनेनंतर प्रशासनाचे लक्ष आपल्याकडे वळेल आणि डोंगरावरील बांधकामे थांबवावी लागतील, अशी भीती त्यांना आहे. गोष्ट डोंगराची आहे. फरक एवढाच की.. अनेकांसाठी ती भीतीची तर काहींसाठी नफ्या-तोटय़ाची.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Story of mountain fear loss and gains

ताज्या बातम्या