मायावतींच्या सभेपासून सुरूवात
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असून आगामी काळात विविध राजकीय पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या जाहीर सभांचा धुरळा उडणार आहे. याशिवाय, उमेदवारी अर्ज दाखल करतानाही नेत्यांना पाचारण करून शक्तिप्रदर्शन करण्याचा उमेदवारांचा प्रयत्न आहे. या काळात जाहीर सभा व कार्यकर्ता मेळाव्यांच्या माध्यमातून राजकारणातील अनोख्या छटांचे दर्शन घडणार आहे. म्हणजे, ज्या गोदातीरी महिनाभरापूर्वी भाजपचे नेते नितीन गडकरी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून मैत्रीचा नवा अध्याय रचण्याचा प्रयत्न झाला, त्याच शहरात पुन्हा गडकरी यांना बोलावून शिवसेनेच्या प्रचारार्थ उभे करण्याची रणनीती आखली जात आहे. जाहीर सभा गाजविणारे राज्यासह देशातील अनेक दिग्गज नेते प्रचाराच्या निमित्ताने नाशकात दाखल होणार असून त्या अनुषंगाने नियोजनाला सर्वपक्षीय यंत्रणा कामास लागली आहे.
गारपीट व अवकाळी पावसामुळे ग्रामीण भागात प्रचाराला अद्याप म्हणावा तसा जोर चढलेला नाही. किंबहुना या भागात नेहमीच्या उत्साहात प्रचार करणेही अवघड आहे. त्यामुळे सांत्वन व दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून शांततेत प्रचार यंत्रणा राबविण्याचे नियोजन बहुतेक पक्षांनी केले. दुसरीकडे शहरी भागात भेटीगाठी घेऊन उमेदवार व पक्षीय कार्यकर्ते प्रचारात गुंतले असले तरी खरा रंग चढतो तो, फड गाजविणाऱ्या जाहीर सभांनी. नाशिक व दिंडोरी मतदारसंघात २९ मार्च ते ५ एप्रिल या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल होतील. काही राजकीय पक्षांनी तत्पूर्वी तर काही पक्षांनी प्रचार संपण्याच्या अखेरच्या टप्प्यात जाहीर प्रचार सभांचे नियोजन केले आहे. नाशिक जिल्हय़ात या प्रचाराचा शुभारंभ बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांच्या जाहीर सभेने होईल. नाशिक लोकसभा मतदारसंघात बसपाने यंदा पुन्हा उमेदवार िरगणात उतरविला आहे. गुरुवारी दुपारी दोन वाजता बसपाच्या अध्यक्षा मायावती यांची सभा हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर होईल. याच दिवशी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या संयुक्त मेळाव्याचे आयोजन केले आहे. भाभानगर येथील दादासाहेब गायकवाड सभागृहात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत हा मेळावा होईल. त्यानंतर शुक्रवारी दिंडोरी मतदारसंघातील काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ शरद पवार यांची जाहीर सभा सायंकाळी चार वाजता वणी येथे होणार आहे. या शिवाय, उमेदवारी अर्ज दाखल करताना व नंतरच्या काळातही दोन्ही पक्षांतील नेत्यांच्या सभा घेण्याचा काँग्रेस आघाडीचा मानस आहे. शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ नरेंद्र मोदी, उद्धव ठाकरे, गोपीनाथ मुंडे, रामदास आठवले यांच्यासह इतरही नेत्यांना आणण्याचा प्रयत्न आहे. त्यात भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांच्याही नावाचा समावेश आहे. गडकरी यांच्या नावासाठी सेनेच्या गोटातून विशेष प्रयत्न केले जात आहेत. महिनाभरापूर्वी झालेल्या गोदा उद्यानाच्या भूमिपूजन सोहळ्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि नितीन गडकरी यांनी परस्परांवर उधळलेल्या स्तुतिसुमनांमुळे सेनेच्या गोटात कमालीची अस्वस्थता पसरली होती. दरम्यानच्या काळात गडकरी यांनी मनसे अध्यक्षांना साकडे घालून लोकसभेसाठी उमेदवार उभे न करण्याचे आवाहन केले होते. या घटनाक्रमामुळे हबकलेल्या शिवसेनेच्या नेत्यांनी गडकरी यांच्यावर शरसंधान साधले. लोकसभा निवडणुकीत महायुतीमध्ये कोणताही बेबनाव नाही, हे दर्शविण्यासाठी खुद्द गडकरी यांची जाहीर सभा आयोजित करण्याचा सेनेचा प्रयत्न आहे. उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा १८ एप्रिल रोजी गोल्फ क्लब मैदानावर होणार आहे. उर्वरित नेत्यांच्या सभांच्या तारखा अद्याप निश्चित झाल्या नसल्याचे सांगण्यात आले. सलग दोन दिवस राज ठाकरे यांच्या जाहीर सभांचा धडाका करण्याचे नियोजन मनसेकडून केले जात आहे. हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर राज यांची सभा होईल की नाही हे अद्याप निश्चित नसले तरी मतदारसंघातील सर्व भागांत परिणामकारता साधता येईल याचा प्राधान्याने विचार केला जात असल्याचे सांगण्यात आले. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात राज यांची किमान एक सभा व्हावी, असा मनसेचा प्रयत्न आहे आम आदमी पक्षातर्फे अरविंद केजरीवाल यांची जाहीर सभा आयोजित करण्याचा प्रयत्न आहे. याकरिता स्थानिक उमेदवार व कार्यकर्ते पाठपुरावा करीत असले तरी त्यांची सभा होईल की नाही याबद्दल अनिश्चिता आहे. डाव्या आघाडीने नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघात वृंदा करात, सिताराम येचुरी, गोविंद पानसरे, भालचंद्र कांगो, नरसय्या आडाम आदींच्या सभा आयोजित करण्याचे नियोजन केले आहे.

गर्दीचा उच्चांक कोण मोडणार ?
शहराच्या मध्यवर्ती भागात असणारे हुतात्मा अनंत कान्हेरे हे सभेच्या प्रचारासाठीचे अतिशय महत्त्वपूर्ण मैदान. एक लाखाहून अधिकची क्षमता असणाऱ्या या मैदानावरील जाहीर सभांकडे सर्वाचे लक्ष असते. यामुळे या मैदानावर जो पक्ष सभा आयोजित करतो, तोदेखील गर्दी कशी जमविता येईल याची धडपड करतो. लोकसभा निवडणुकीत बसपाच्या अध्यक्षा मायावती यांच्या जाहीर सभेने या मैदानावर जाहीर सभेचा श्रीगणेशा होत आहे. उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा याच मैदानावर होणार आहे. गत लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आघाडी, सेना-भाजप युती, मनसे आणि बसपा या पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या सभा याच मैदानावर झाल्या होत्या. यंदादेखील या मैदानावर सभा घेण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष उत्सुक आहेत. या जाहीर सभांमध्ये गर्दीचा उच्चांक कोण मोडणार, याकडे सर्वाचे लक्ष आहे.