वासुदेव आला रे वासुदेव..

उरण लोकसभा निवडणुकीसाठी विविध साधनांचा वापर करून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न लोकसभेची निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांकडून केला जात आहे.

उरण लोकसभा निवडणुकीसाठी विविध साधनांचा वापर करून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न लोकसभेची निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांकडून केला जात आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार पश्चिम महाराष्ट्रातील लोककलाकारांच्या पथकांचा वापर करून तसेच नाक्या-नाक्यांवर पथनाटय़ सादर करून प्रचाराचे तंत्र राबविण्यात येत आहे. भल्या पहाटे येणारा वासुदेव उमेदवारांचा जागर करीत आहे. हायटेक प्रचार यंत्रणेच्या माध्यमातून उमेदवारांकडून राबविण्यात येत आहे. मात्र शहरी-ग्रामीण असा दुहेरी भागांचा समावेश असलेल्या मतदारसंघात लोककलाकारांच्या माध्यमातून प्रचाराची शक्कल उमेदवार लढवीत आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघात गटागटाने लोककलाकार व पथनाटय़ सादर करणारे कलाकार नियुक्त करण्यात आलेले आहेत. यामध्ये सहा ते सात जणांच्या गटाचा समावेश असून पहाटेपासूनच या प्रचाराला सुरुवात केली जात आहे. यात सकाळी गाणी गात वासुदेव मतदारांच्या घरोघरी फिरून तो प्रचार करीत असलेल्या उमेदवाराची माहिती देत, त्याला विजयी करण्याचे आवाहन करीत असल्याची माहिती अशाच एका कलाकारांच्या गटातील वासुदेव साकारणारे धनंजय पोळ यांनी दिली आहे. या पथकांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन उमेदवारांचा प्रचार केला जात आहे. त्यामुळे प्रचारही होत असून लोककलाकारांच्या कलेचाही आस्वाद मतदाराला मिळत आहे. पथनाटय़ाच्या माध्यमातून उमेदवाराचा परिचय, पक्षाची भूमिकाही मांडली जात आहे. अनेकदा पथनाटय़ हे प्रभावी माध्यम म्हणून सिद्ध झालेले आहे. त्यामुळे या प्रभावी माध्यमाचा वापर करून वेगळ्या पद्धतीचा प्रचार केला जात आहे.
अशा प्रचाराला मतदार व जनतेकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या पथकात युवक व युवतींचा समावेश असून वेगवेगळ्या जिल्हय़ांतील ही तरुण मंडळी असून निवडणुकीच्या निमित्ताने लोककलाकारांनाही रोजगार उपलब्ध झालेला आहे. त्यामुळे २०१४ च्या निवडणुकीत फेसबुक, हॉट्सअ‍ॅप अशा नेटकरी तरुणांपर्यंत पोहोचण्याबरोबरच लोककलेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंतही पोहोचण्याचा मार्ग आता उमेदवारांनी निवडला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Street plays for election publicity