सांगली महापालिकेच्या निवडणुकीतील काँग्रेसच्या एकहाती विजयामुळे नगरमधील काँग्रेसच्या‘एकला चलो रे भूमिकेस पाठबळच मिळाले आहे. पक्षाच्या याच‘स्वबळाच्या तयारीमुळे अनेकजण पक्षाचे काम करण्यास तयार झाले आहेत, त्यामध्ये इतर पक्षांतीलही काही पदाधिका-यांचा समावेश आहे, त्यादृष्टीने भेटीगाठी सुरू आहेत, असा दावा शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ब्रीजलाल सारडा यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केला.
काँग्रेसने यापूर्वी नांदेड महापालिकेतही स्वबळावर सत्ता मिळवली, आता राष्ट्रवादीकडून सत्ता खेचून घेत सांगली-मिरज-कुपवाड मनपामध्येही स्वबळ दाखवले. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी नगरमध्येही स्वबळावर निवडणूक लढवण्याला परवानगी द्यावी, अशीच पक्षाच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे, शिर्डी येथे प्रदेशाध्यक्षांकडेही आपण हीच मागणी नोंदवली आहे, सांगलीतील विजयामुळे आपल्या या मागणीस पाठबळच मिळाले आहे, अशी सारडा यांची प्रतिक्रिया आहे.
नगर शहर काँग्रेसचा परंपरागत बालेकिल्ला आहे. पक्षाची हक्काची मते आहेत, पक्षसंघटनेतही आता चांगला बदल झाला आहे, त्यातून चांगली यंत्रणा उभी राहिल्यास तसेच पक्षश्रेष्ठींची एकसंघ ताकद मिळाल्यास नगरमध्येही पक्ष परिवर्तन घडवू शकतो. मागील निवडणुकीतही काही जागा अत्यंत कमी मतांच्या फरकाने गमवाव्या लागल्या आहेत. आताही सर्व जागांसाठी आमच्याकडे उमेदवार आहेत. नगर मनपाच्या कारभाराविषयी नागरिकांत मोठी नाराजी आहे, राज्यात काँग्रेसकडे सत्ता असल्याने नगर विकासासाठी निधीची कमतरता भासणार नाही, याकडे सारडा यांनी लक्ष वेधले.
काम करणा-या कार्यकर्त्यांना आघाडीमुळे तडजोड स्वीकारावी लागते, त्यातून नाराजी वाढते. चांगले काम करणा-या कार्यकर्त्यांवरही अन्याय होतो, त्यामुळे काँग्रेसच्या श्रेष्ठींनी याबाबतचा निर्णय लवकर घ्यावा, अशीच आपली भूमिका आहे, असे सांगून सारडा यांनी पक्षाची ‘एकला चलो’ भूमिका अनेकांना पसंत पडल्याने नवीन कार्यकर्ते पक्षाकडे आकर्षित होत आहेत, अन्य पक्षांतीलही अनेक पदाधिका-यांचा त्यात समावेश आहे, अशा इच्छुकांशी चर्चा सुरू असल्याचे सूतोवाच केले.