सोमवारी रिक्षा चालकांचे धरणे आंदोलन

परिवहन खात्याकडून होणाऱ्या जाचक अटी तसेच वेगवेगळ्या मागण्यांसाठी आझाद मैदानामध्ये धरणे आंदोलन करण्याचा निर्णय कोकण विभागासह ठाणे शहरातील रिक्षा संघटनांनी घेतला आहे. शहरात रिक्षा चालकांकडून भाडे नाकारण्याचे प्रकार सुरू असतानाच रिक्षा संघटनेने पुकारलेल्या आंदोलनामुळे ठाणेकरांचे अतोनात हाल

परिवहन खात्याकडून होणाऱ्या जाचक अटी तसेच वेगवेगळ्या मागण्यांसाठी आझाद मैदानामध्ये धरणे आंदोलन करण्याचा निर्णय कोकण विभागासह ठाणे शहरातील रिक्षा संघटनांनी घेतला आहे. शहरात रिक्षा चालकांकडून भाडे नाकारण्याचे प्रकार सुरू असतानाच रिक्षा संघटनेने पुकारलेल्या आंदोलनामुळे ठाणेकरांचे अतोनात हाल होण्याची शक्यता आहे. तसेच रिक्षा चालकांच्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या राजकीय रिक्षा संघटना मात्र प्रवाशांच्या मागण्यांकडे फारसे लक्ष देत नसल्याचे गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेतून दिसून आले.
कोकण विभागातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्य़ांतील रिक्षा चालकांचा मेळावा नुकताच आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये परिवहन खात्याकडील जाचक अटी आणि वेगवेगळ्या मागण्यांसाठी येत्या २९ जुलैला आझाद मैदानामध्ये धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या आंदोलनात सर्वच राजकीय पक्षांच्या संघटना सहभागी होणार आहेत, असे ठाणे रिजन रिक्षा-टॅक्सी महासंघाचे अध्यक्ष प्रकाश पेणकर यांनी सांगितले. पावसाचे दिवस असल्याने तसेच आंदोलनाच्या दिवशी सोमवार असल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होतील, असे मान्य करत शासनाच्या नाकर्तेपणामुळेच आंदोलन करावे लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गेल्या काही वर्षांपासून शहरातील रिक्षा चालकांकडून भाडे नाकारण्याचे तसेच दादागिरीचे प्रकार वाढू लागले आहेत. मात्र, त्याकडे रिक्षा संघटनांचे पुरतेच दुर्लक्ष होत असल्याचे चित्र पाहावयास मिळते. रिक्षासाठी प्रवाशांना शहरातील चौकाचौकामध्ये तासन्तास ताटकळत उभे राहावे लागते. असे असतानाच रिक्षा संघटनांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे आता हाल होण्याची चिन्हे आहेत. सर्वच रिक्षा चालकांकडून भाडे नाकारण्यात येत नाही, काही रिक्षा चालक असे प्रकार करत असल्याचे मान्य करत त्यांच्याविरोधात पोलिसांनी कारवाई करावी, असे रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. मात्र, रिक्षा संघटना अशा रिक्षा चालकांवर काय कारवाई करणार, यावर रिक्षा संघटनेचे पदाधिकारी अनुत्तरितच होते. विशेष म्हणजे, काही रिक्षा चालक रांगेच्या बाहेर उभे राहून प्रवासी घेतात. काही प्रवासी जादा भाडे देत असल्याने त्यांना सवय लागल्याचे सांगत त्यांनी काही प्रवाशांनाही दोषी ठरविले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Strick by autorickshaw drivers on monday