ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयातील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांच्या कार्यपद्धतीविरोधात नाराजी व्यक्त करत दलालांनी सोमवारपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले असून त्यामध्ये जुने आणि नवीन आरटीओमधील सुमारे दोनशे ते अडीचशे दलाल सहभागी झाले आहे. त्यामुळे वाहनांची नोंदणी तसेच अन्य कामे काहीशी रखडल्याचे चित्र दिसून आले. दरम्यान, कार्यालयीन कामकाज सुरळीतपणे सुरू असल्याचा दावा आरटीओच्या अधिकाऱ्यांनी केला आहे, पण असे असले तरी, आरटीओमधील बहुतेक कामे दलालांमार्फतच होत असल्याने या आंदोलनाचा परिणाम आरटीओच्या महसुली उत्पन्नावर होण्याची शक्यता आहे.
दोन महिन्यांपूर्वीच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांची ठाणे येथील कार्यालयात बदली झाली असून ते यापूर्वी कल्याण येथील कार्यालयात कार्यरत होते. कल्याण-डोंबिवली परिसरात मीटरप्रमाणे रिक्षा धावाव्यात, यासाठी ते आग्रही होते. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षाचालकांविरोधात त्यांनी मोहीम हाती घेतली होती. त्यासाठी स्वत: ते रस्त्यावर उतरले होते. त्यामुळेच रिक्षाचालकांचा त्यांच्यावर रोष होता. मात्र, कल्याण-डोंबिवली येथील नागरिकांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या मोहिमेचे कौतुक केले होते. दरम्यान, ठाणे कार्यालयात रुजू झाल्यानंतर त्यांनी आपल्या कार्यपद्धतीनुसार कामकाज सुरू केले आहे. मात्र, त्यांच्या याच कार्यपद्धतीविरोधात ठाणे आरटीओतील दलाल काहीसे नाराज आहेत. त्याच पाश्र्वभूमीवर त्यांनी सोमवारपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू  केले आहे. नव्या तसेच जुन्या वाहनांची नोंदणी आणि अन्य कामे दलालांनी पूर्णपणे बंद केली आहेत. त्यामुळे सोमवारी दिवसभरात दलालांकडून आरटीओला होणारा टॅक्सचा भरणा होऊ शकलेला नाही, अशी माहिती दलालांनी दिली. दरम्यान, कार्यालयीन कामकाज सुरळीतपणे सुरू असून दलालांना आरटीओने नेमलेले नाही. त्यामुळे त्यांच्यासोबत बैठक घेण्याचा प्रश्नच येत नाही, असे संजय डोळे यांनी स्पष्ट केले.