गेल्यावर्षी आंदोलन करून विद्यापीठाच्या परीक्षांवर परिणाम करणाऱ्या प्राध्यापकांच्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला शासन अजिबात भीक घालत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तर दुसरीकडे समाजातील कोणताच घटक विद्यार्थ्यांना वेठीस धरून सुरू असलेल्या आंदोलनाला सहानुभूती दाखवत नाही. उलट काही शिक्षक संघटनांनीच प्राध्यापकांच्या आंदोलनाला विरोध करून प्राध्यापकांच्या संघटनांना ‘ब्लॅकमेलर’ ठरवले आहे. प्राध्यापकांची शिखर संस्था असलेल्या एमफुक्टोच्या अनेक मागण्यांशी शासनाने असहकाराचे धोरण अवलंबलेले दिसून येते. आंदोलन सुरू झाल्यापासून जेवढय़ांदा शासनाच्या पातळीवर एमफुक्टोच्या बैठका झाल्या त्या फिसकटल्या किंवा रद्द तरी झाल्या. दोन महिन्यापासून शासन आंदोलनाकडे ढुंकूनही पाहत नसल्याने अनेक संपकरी प्राध्यापकांचे मनोधैर्य खचले आहे. त्यांची अवस्था ‘सुंभ जळाला पण पीळ कायम’ असल्यागत झाली आहे. कारण परीक्षेच्या कामात सहकार्य न करणाऱ्या प्राध्यापकांवर गुन्हे दाखल करण्याची मुभाही शासनाने दिली आहे.
१९ सप्टेंबर १९९१पासून अधिव्याख्याता होण्यासाठी उमेदवार नेटसेट उत्तीर्ण असायला हवे, अशी युजीसीची अट होती. प्राध्यापकांच्या संघटनांनी वेळोवेळी आंदोलने करून, दबाव तंत्राचा वापर करून वेळोवेळी अटी शिथील करण्यास भाग पाडले. नोकरीला लागल्यापासून लाभ मिळाला पाहिजे, हा संपकरी प्राध्यापकांचा उद्दामपणा अशोभनीय आहे. वेतनवाढीसाठी काढलेल्या शासन निर्णयांच्या अंमलबजावणीसाठी संघर्ष करायचा आणि पात्रतेबाबतचे शासन निर्णय अमान्य करायचे असा प्राध्यापकांचा दुटप्पीपणा असल्याचे इतर शिक्षक संघटना मानतात. संपकरी प्राध्यापकांच्या याच दुटप्पीपणामुळे त्यांची प्रतिमा समाजात मलिन होत असून त्यांच्याविषयी साधी सहानुभूतीही समाजात नाही.
चौकट करावी
विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील विद्यापीठीय व महाविद्यालयीन प्राध्यापकांचे परीक्षेशी संबंधित सर्व कामाशी असहकार आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाविषयीच्या सद्यस्थितीची माहिती देण्यासाठी प्राध्यापकांची सभा मंगळवारी २ एप्रिलला दुपारी ४ वाजता धनवटे नॅशनल महाविद्यालयाचे डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात आयोजित केलेली आहे.
या सभेला माजी आमदार बी.टी. देशमुख, नुटा अध्यक्ष डॉ. प्रवीण रघुवंशी, सचिव डॉ. अनिल ढगे, डॉ. बबन तायवाडे, डॉ. विलास ढोणे आणि प्रभू देशपांडे यावेळी उपस्थित राहणार आहेत. प्राध्यापकांनी मोठय़ा संख्येने यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन नुटाच्यावतीने करण्यात आले आहे.