डेक्कन येथील एनसीसी प्रशिक्षण केंद्रात गोळीबार प्रशिक्षणादरम्यान एक विद्यार्थी अचानक उभा राहिल्यामुळे त्याच्या डोक्यात गोळी लागल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. जखमी विद्यार्थ्यांवर लष्कराच्या कमांड हॉस्पिटल येथे उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे. या प्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून चौकशी केल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल, असे डेक्कन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर जोशी यांनी सांगितले. पराग देवेंद्र इंगळे (वय १४, रा. पांडवनगर) असे जखमी झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पराग हा लॉयला प्रशालेचा विद्यार्थी असून तो आठवीमध्ये शिकतो. शुक्रवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास डेक्कन येथील एनसीसीच्या प्रशिक्षण केंद्रात आला होता. या वेळी ४६ विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षक अमोद घाणेकर हे गोळीबाराचे प्रशिक्षण देत होते. सर्व विद्यार्थ्यांना
जमिनीवर झोपून (ले डाउन) गोळीबाराची माहिती देत होते. त्या वेळी घाणेकर यांनी एक गोळी झाडली. त्या वेळी पराग अचानक उठून उभा राहिला. त्यामुळे त्याच्या डोक्यात गोळी लागली. त्याला तत्काळ कमांड हॉस्पिटल येथे हलविण्यात आले. या ठिकाणी परागवर शस्त्रक्रिया करून डोक्यातून गोळी काढण्यात आली. त्याची प्रकृती स्थिर आहे. याबाबत जोशी यांनी सांगितले, की या प्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात एनसी दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी तपास सुरू आहे. प्रशिक्षणादरम्यान कोणाचा हलगर्जीपणा झाला का, याचा तपास सुरू आहे. तपासानंतरच दोषी असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल. एनसीसी ट्रेनिंग ग्रुप विभागाचे प्रशिक्षण अधिकारी ए. के.
सिंग यांनी सांगितले की, डेक्कन येथील प्रशिक्षण केंद्रात वर्षांला हजारो विद्यार्थी प्रशिक्षण घेत असतात. शुक्रवारी दुपारी ४६ विद्यार्थ्यांची तुकडी गोळीबार प्रशिक्षण मैदानावर गोळीबाराचे प्रशिक्षण घेत होती. त्या वेळी गोळी अपघाताने एका विद्यार्थ्यांच्या डोक्यात लागली. त्या विद्यार्थ्यांला तत्काळ लष्काराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले
आहे. या प्रकरणी अंतर्गत चौकशी सुरू आहे. यामध्ये कोणी दोषी आढळल्यास त्या व्यक्तीवर कारवाई केली जाईल.