‘मराठी साहित्या’त मुंबई विद्यापीठाच्या ‘दूर व मुक्त अध्ययन संस्थे’मार्फत (आयडॉल) पदव्युत्तर पदवी (एमए-भाग १) परीक्षा देणाऱ्या काही विद्यार्थ्यांना अमुक दोन लेखकांचे कथासंग्रह अभ्यासक्रमातून वगळण्यात आल्याची चुकीची व दिशाभूल करणारी माहिती खुद्द प्राध्यापकांनीच दिल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. नेमक्या याच कथालेखकांच्या साहित्यकृतीवर परीक्षेत प्रश्न विचारण्यात आल्याने या विद्यार्थ्यांना २० गुणांवर पाणी सोडावे लागणार आहे.
या विद्यार्थ्यांची परीक्षा २२ एप्रिलला झाली. आयडॉलच्या विद्यार्थ्यांना प्राध्यापकांमार्फत नियमित मार्गदर्शन मिळत नाही. त्यामुळे विद्यापीठाच्या मराठी विभागातील काही प्राध्यापकांचे मार्गदर्शन वर्ग या विद्यार्थ्यांकरिता घेतले जातात. त्यापैकी मराठी साहित्य या विषयातून एमए करणाऱ्या विद्यार्थ्यांना मराठी कथासंग्रह या विषयावर एक पेपर द्यावा लागतो. या पेपरच्या एका भागात कथेचे प्रकार, समीक्षा आदी विषय हाताळले जातात. तर दुसऱ्या भागात नेमून दिलेल्या विविध लेखकांचे कथासंग्रह अभ्यासाला असतात.
या पेपरच्या अभ्यासक्रमात नेमून दिलेल्या आठ कथालेखकांमध्ये गौरी देशपांडे आणि बागुराव बागुल यांचाही समावेश होता. मात्र, ‘मार्गदर्शन वर्गाच्या दरम्यान या दोन लेखकांचे कथासंग्रह अभ्यासक्रमातून वगळण्यात आले आहेत. त्यामुळे, तुम्ही त्यांचा अभ्यास करू नका,’ असे एका प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना सांगितले. केवळ एकदाच नव्हे तर ही माहिती दोनतीन वेळा विद्यार्थ्यांना याच प्राध्यापकांमार्फत पुरविण्यात आली.
त्यांच्या माहितीवर विसंबून विद्यार्थ्यांनी अभ्यासातून हे दोन कथालेखक बाद केले. पण, परीक्षेत प्रश्न क्रमांक तीनमध्ये नेमक्या याच दोन कथालेखकांच्या कथांची समीक्षा करण्याचे पर्याय देण्यात आले. ‘गौरी देशपांडे किंवा बाबुराव बागुल’ असा तो प्रश्न होता. पण, ‘प्राध्यापकांच्या माहितीवर विसंबून आम्ही हे दोन्ही लेखक अभ्यासातून वगळल्याने आम्हाला हा प्रश्न लिहिताच आला नाही. परिणामी या प्रश्नासाठीच्या २० गुणांवर आम्हाला पाणी सोडावे लागले,’ अशी तक्रार एका विद्यार्थिनीने केली.

तर विश्वास कोणावर ठेवायचा?
गौरी देशपांडे किंवा बाबुराव बागुल आम्ही बिलकुलच वाचले नाहीत, असे नाही. पण, परीक्षेत समीक्षेच्या अंगाने त्यांच्यावरील प्रश्नाचे दीघरेत्तरी उत्तर लिहिणे वेगळे. पण, या प्राध्यापक महाशयांच्या माहितीवर विसंबून आम्ही हे कथालेखक अभ्यासले नाहीत. हे प्राध्यापक मराठी विभागात कार्यरत आहेत. तेच जर आम्हाला चुकीची माहिती देत असतील तर आम्ही विश्वास कुणावर ठेवायचा?
एक परीक्षार्थी, एमए-भाग १ (मराठी साहित्य)